श्रीतुकयाबंधू - श्रीकान्होबा
दिसेचिना बंधुराज
कान्हो विचारीत जना
दिसला का तुम्हा कोठे
बंधु तुकोबा सांगाना !
पिंपुरणी वृक्षातळी
पाहे तुळशीची माळ
वीणा सतत जवळी
तुका हातीचे ते टाळ
तारा वीणेच्या झुकल्या
टाळ पडे अस्ताव्यस्त
माळ तुळशीची पडे
धुळीमाजी ती अस्वस्थ
पाही कान्होबा निश्चळ
गाली कोरडा ओघळ
काय केलेसी विठ्ठला
डोई नुरले आभाळ
डोह इंद्रायणी स्थिर
नुठे एकही तरंग
पान उडूनी एकुटे
कान्हा पुढ्यात अभंग
देह तरी नाशिवंत
तुम्ही जाणता निश्चित
एक हरीनाम सत्य
तेचि घ्यावे दिनरात
विठूराये कृपा केली
धाडी प्रत्यक्ष विमान
तुका जातो वैकुंठासी
हात विठ्ठल धरोन
सार दाविले संपूर्ण
गाथा विठूचे वचन
ह्रदी विठ्ठल राखोन
व्यवहार तो जपून
चित्त पावे समाधान
जाणा विठूची ती खूण
सुखदुःख ते समान
ह्रदी विठूचे स्मरण
अभंगास ते देखता
कान्हो स्फुंदत रडोन
बोले तुकोबा विठ्ठला
नको कोरडे सांत्वन
ठाके स्वये तो विठ्ठल
एकाबाजू तुकाराम
कान्होबास आलिंगीती
नुरे देहभाव भ्रम
-------------------------------------------------------
श्रीकान्होबा हे श्रीतुकोबारायांचे धाकटे बंधुराज. त्यांचे तुकोबांवर निरतिशय प्रेम होते. तुकोबांच्यामुळे कान्होबाही विठ्ठलभक्तीत रमलेले होते, त्यांनी रचलेले काही अभंगही तुकाराम गाथेत आहेत.
जेव्हा त्या फाल्गुन वद्य द्वितीयेला (ज्याला आपण सध्या तुकाराम बीज म्हणतो) तुकोबा बेपत्ता झाले तेव्हा कान्होबांनी तुकोबांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. पण इंद्रायणीच्या डोहाशेजारील पिंपुरणी वृक्षाखाली त्यांना तुकोबांच्या गळ्यातील तुळशी माला, तुकोबांचे टाळ व वीणा दिसली तेव्हा तुकोबा या जगात नाहीत हे त्यांच्या लक्षात आले व त्यांचे भाव अनावर होऊन त्यांनी अक्षरशः टाहो फोडला.
धिंद धिंद तुझ्या करीन धिंदड्या । ऐसे काय वेड्या जाणितले ।।
या शब्दात तसेच
भुक्ती मुक्ती तुझे जळो आत्मज्ञान । दे माझ्या आणोनी भावा वेगी ।।
अशा स्वरुपात त्यांनी प्रत्यक्ष श्रीविठ्ठलासही आव्हान दिल्याचे अनेक अभंगात दिसून येते.
कान्होबांची व्याकुळता लक्षात घेऊन विश्वात्मक झालेल्या श्रीतुकोबांनी स्वहस्ताक्षरातले अभंग कान्होबांपुढे देत त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण या सर्व कोरड्या तत्त्वज्ञानामुळे कान्होबांचे मानवी मन काही केल्या शांत होत नव्हते. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्यक्ष श्रीविठ्ठलानेच श्रीतुकोबारायांसमवेत श्रीकान्होबांना दर्शन देऊन त्यांचे सांत्वन केले - अशा स्वरुपाचे एक भाव वर्णन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न.
श्रीविठ्ठलमहाराज, श्रीतुकोबाराय व श्रीकान्होबा माझी बाळचावटी सहन करतीलच अशी आशा आहे.
वाह!! अफाट.
वाह!! अफाट.
नेहमीप्रमाणेच सुंदर.
नेहमीप्रमाणेच सुंदर.
खुप छान.
खुप छान.
सुरेख!
सुरेख!