पांडुरंग

लपलासी कोठे

Submitted by Meghvalli on 31 March, 2024 - 01:05

आता होतासी
लपलासी कोठे
सख्या पांडुरंगा
शोधू तुज कोठे

लपंडाव देवा
का खेळिसी
पोच माझी नाही
तुज शोधू मी

मन ना निर्मल
बुद्धी ना विमल
मी दुर्बल सर्व ठायी
कागा विठाई परिक्षिसी

धरी हात आता
का देसी चिंता
भवार्ण तरावया
मज बळ नाही

जरी तु देवा
आला न भेटीस
नाव रख्माईस
बघ सांगेन मी

या उपरी जरी
तू न कृपा करी
चंद्रभागा कुशीत
देवा जाईन मी

'मेघ' म्हणे देवा
तिढा सोडवा हा
खेळ तो मांडावा
किती तव भक्ताचा

सप्तपदि

Submitted by अवल on 9 April, 2023 - 18:21

(सात सात शब्दांचा समूह, म्हणून सप्तपदि.
एका मैत्रिणीचा सायकलीवरून वारी करण्याचा संकल्प आहे. तर त्यावरून पहिली सप्तपदि सुचली. मग पुढचंही काही सुचत गेलं. चुभूद्याघ्या.)

चालवुनि चाका, गरगरा पायी
भेटीलागी जिवा, चक्रधारी!

चालविशी किती, अनाथांच्या नाथा
आस लागली, पंढरीनाथा!

डोईवरी हात, ठेवी आजोबा
त्यांच्यातच पाही, विठोबा!

अभंग गाई, तुक्याची सावली
टेकतो माथा, विठुमाऊली!

संपत्ती सत्ता, संपेना हाव
सुटो पाश, गुरूराव!

सोडोनिया सारा, सग्यांचा संग
आलो पायाशी, पांडुरंग!

हाळी पंढरीची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 June, 2022 - 01:09

हाळी पंढरीची आली
बंधनांची बेडी तुटली
पाऊले बेभान धावली
पंढरपूरी ती विसावली

गेले गळूनी देहभान
कुठे अंथरुण,पांघरुण
ध्यास एकची रातदीन
आला वैष्णवांचा दिवाळसण

नको सांगाती द्रव्यराशी
लुगडं,धोतर,घडशी पुरेशी
अनमोल सखा विठू बरोबर
सांडीला संसार वा-यावर

गर्वाला नाही स्थान
सारेची संत सज्जन
भेदाभेद गेले विरुनी
मीपण गेले सरुनी

मीठ, भाकरीही पक्वान्न
तोंडी लावाया भजन
तुका आंधळ्याची काठी
माऊली धरीते पोटी

शब्दखुणा: 

धाव पांडुरंगा

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2019 - 23:41

धाव पांडुरंगा

संवसारा लागी । व्याकुळ होऊनी ।
जातो विसरुनी । पांडुरंगा ।।

काय तो आठव । नाहीच सर्वथा ।
सदा व्यापी चित्ता । संसारची ।।

सुखदुःखी गोवे । सदा सर्वकाळ ।
नित्य हळहळ । ऐहिकाची ।।

नसेचि सत्संग । नसे नाम मुखी ।
अनुसंधानासी । तुटी पूर्ण ।।

धाव पांडुरंगा । नसावा वियोग ।
अनुताप योग । घडो मज ।।

दीनानाथ करी । साच तुझे ब्रीद ।
सर्व माझे हित । तुज पायी ।।

गोवणे.... गुंतणे

आगळे दैवत

Submitted by पुरंदरे शशांक on 26 July, 2018 - 00:39

आगळे दैवत

सगुण निर्गुण । मिळोनी सावळे । साच आकारले । विटेवरी ।।

संत गाती नित्य । जयाची महती । तोचि तो सांगाती । अनाथांचा ।।

न चलेचि मात । लौकिक संपत्ती । भक्तीप्रेमासाठी । लोभावला ।।

यज्ञयागादिकी । नकोच सायास । विचित्र नवस । पावावया ।।

भाव भक्ती शुद्ध । वर्म एकुलते । लाभले गोमटे । संतकृपे ।।

मन बुद्धी चित्त । ठेविता पायांशी । जोडे अविनाशी । समाधान ।।

आगळे दैवत । लाभे संतकृपे । सहज सोहोपे । सर्वांलागी ।।

होऊ पूर्ण लीन । पांडुरंगा पायी । भक्तीसुख देई । सर्वकाळ ।।

.........................................................

वारी

Submitted by पुरंदरे शशांक on 22 July, 2018 - 00:37

वारी

दिंडी आली हाकारत
चला जाऊ पंढरीसी
ओढ सरेना प्रपंची
मनी एक कासाविशी

तुका ज्ञानाच्या गजरी
शांत होऊनी काहिली
घोर लागतो जीवाला
कधी भेटेल माऊली

वाचे उच्चार नामाचा
रुप विठूचे नयनी
आर्त होऊनी हाकारी
मज भेटवा जननी

दिंडी निघे पंढरीस
सल ह्रदयास चिरी
विठूमाई पालविते
उभारोनी दोही करी

श्वास श्वास ओवूनिया
नाम ठसूदे अंतरी
ध्यास विठूचा सतत
क्षणोक्षणी साधो वारी...

....................................

विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल

ज्ञानोबा माऊली तुकाराम

ताल धरी पांडुरंग

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 April, 2018 - 02:14

( शशांकजींच्या भक्तिमय रचनांच्या प्रेरणेतून )

ताल धरी पांडुरंग

मनातला भक्तिभाव
प्रगटता कागदावं
भाग्योदय त्याचा झाला
आला आला त्याला जीव

ओळ ओळ रखुमाई
अर्थोअर्थी चंद्रभागा
ताल धरी पांडुरंग
साथ देउनी अभंगा

शाई भक्तिरस प्याली
अक्षरांसी वाचा आली
पान बोलता विठ्ठल
पंढरी दुमदुमली

© दत्तात्रय साळुंके

पांडुरंग

Submitted by कायानीव on 30 July, 2017 - 21:01

कधी कृष्णरंग तू कधी पांडुरंग
सदा रंगहीन नि सदा सर्वरंग

निर्गुण म्हणता तुला रंग नाही
सर्वांना खेचसी काळ्या डोही

सगुण म्हणता तुझा श्वेत रंग
साऱ्याचा उगम तूच रे श्रीरंग

दोन्ही तुझे ठायी काळा नि पांढरा
मध्ये कुठेतरी असे आम्हाला आसरा

जगता सगुण मी आहे पांडुरंग
मरता निर्गुण मी होई कृष्णरंग

©मनीष पटवर्धन
मो. ९८२२३२५५८१

नाम विठोबाचें

Submitted by नवनाथ राऊळ on 28 June, 2015 - 11:53

नारायणनामें । वर्षाव सुखाचा ।
उद्धार जिवाचा । तेणें होय ॥१॥

नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं ।
परमार्थहाटीं । साहुंकार ॥२॥

पांडुरंगनाम । आयुध अजोड ।
समूळ बीमोड । पातकांचा ॥३॥

इहलोकीं हेचि । साधन साचार ।
भवसिंधू पार । करावयां ॥४॥

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥

लाभो संतसंग

Submitted by नवनाथ राऊळ on 24 June, 2015 - 03:06

लाभो संतसंग । भक्तीचा पैं ठेवा ।
घडो हरीसेवा । जन्मोजन्मीं ॥१॥

ज्ञानियांचा राजा । भक्तराज नामा ।
मार्ग विष्णूधामां । उजळितीं ॥२॥

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥

तुका एका चोखा । वैष्णव मंडळी ।
तयां पायधुळीं । नाथ शुद्र ॥४॥

Pages

Subscribe to RSS - पांडुरंग