श्रीनृसिंह अवतार

Submitted by पुरंदरे शशांक on 4 May, 2023 - 05:48

श्रीनृसिंह अवतार

कडाकडाड खांब तोड फोडुनी धडाडले
अफाट तेज वज्र घाती आसमंत लोपले

विराट गर्जना उठे दहा दिशा निनादली
दणाण पाउले ठसे धराही कंप पावली

लकाक नेत्र ज्वाळ लाल भासले वीजेपरी
सुवर्णी केश दीप्तसे मुखा भले सभोवती

मुखास शार्दुला दिसे नरास ऊग्र लाभता
लळालळाल जीभ ती कराल दंष्ट्री ठाकता

क्षणात दैत्य घेउनि खराखरा निखंदला
भळाभळा रुधिर स्त्राव जीव तो विसावला
----------------------------------------------
पुढे उभा नमून बाळ भक्तीयुक्त ओंजळी
प्रभो जरा निवांत व्हा प्रशांतवी ह्रदीतळी

----------------------------------------
घात = आघात
वज्र = देवराज इंद्राचे शस्त्र
धरा = पृथ्वी
शार्दूल = सिंह
नर = मनुष्य
दंष्ट्र = दात
दैत्य = हिरण्यकश्यपू
निखंदला = फाडला
रुधिर = रक्त
जीव = निष्प्राण झालेला दैत्य
बाळ = प्रह्लाद
प्रशांतवी = निववावे
ह्रदीतळी = ह्रदयाला

श्रीलक्ष्मीनृसिंह चरणी अनन्यभावे दंडवत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच.
ख, ट, ठ, ड, ण ह्या कठोर व्यंजनांच्या वृत्तबद्ध पुनरावृत्तीमुळे रौद्ररस निष्पत्ती उत्तम साधली, आणि त्या प्रसंगाचे भव्य भीषण रूप मनात ठसले.

खूप सुंदर!

समर्थांनी लिहलेल्या 'सत्राणे उड्डाणे' ह्या हनुमानाच्या आरतीचे स्मरण झाले.