ऋण

Submitted by निखिल मोडक on 2 May, 2023 - 09:11

वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥

विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥

मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥

केला तयांनी यत्न वेडा मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले॥

द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥

©निखिल मोडक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users