Submitted by निखिल मोडक on 5 May, 2023 - 19:27
अजून देखील केसरवर्खी
सूर्य जरासा दिसतो आहे
चांदण पेरीत आकाशातून
चंद्र जरासा हसतो आहे
अजून देखील कातरकापी
सांज वेंधळी कुढते आहे
नक्षत्रांच्या अनवट लतिका
बांधून मांडव सजतो आहे
अजून देखील थकला रावा
परत कोटरी फिरतो आहे
गाई गुरांचा कळप भागला
कुशल गुराखी वळतो आहे
अजून देखील पाण्यावरती
उंबर अंबर धरतो आहे
काजळ होडीतून नावाडी
जाळे अपुले भरतो आहे
अजून देखील आठव वेणा
देत काळ हा सरतो आहे
आणि इथे ह्या ऐल तीरावर
साजण तुजला स्मरतो आहे
©निखिल मोडक
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा