"माहिती आणि अधिकार"
आजकाल सगळ्यांत जास्त भीती वाटते
ती,
अंगावर धावून येणाऱ्या माहितीची.
कधी पूर आलेल्या ,
नदीसारखी बुडवून गुदमरुन टाकते.
तर कधी ,
अचानक भिरभिरत येणाऱ्या
वादळासारखी चक्रावुन टाकते.
कधी तप्त उन्हात ,अंगाची लाही लाही
करते.
तर कधी ,
अवकाळी पावसासारखी
अचानक कोसळून भिजवून टाकते.
समाज माध्यमातुन कधी खरी तर कधी खोटी!
टेली व्हिजन वहिन्यांमधुन अतिरंजीत , बटबटीत,
नी मेंदुला झिणझिण्या आणणारी.!
थोडक्यात,वास्तव आणि योग्य असेल
तरच तिची गोडी अधिक.
नाहीतर ओल्या दुष्काळातल्या
नासक्या भाजीसारखी ती
रस्त्यात तुडवली जाते.
जनावरेही तोंड नाही लावत तिला.
कानावर आदळुन आदळुन
कानही बधीर झाले आहेत आतां.
आणि संवेदना जागृत करण्याची
माहीतीची क्षमताही नाहिशी झाली आहे.
युग खरेतर माहीती आणि तंत्रज्ञानाचे.
पण नुसतंच तंत्र वापरलं जातंय
ज्ञान काही पोंहचत नाही.
'माहितीला' तर प्रत्येकानेच आपल्या
सोयीनुसार दावणीला बांधुन
फ़रफ़टत नेलंय.
रक्तबंबाळ झालेली ती आसरा
शोधतेय .
तिला आतां हक्काची जागा तर हवीच आहे.
पण त्यावर "अधिकारही " हवाय.
डॉ० शुभागिनि कपिल महाजन.
उमरगा