भास-आभास
नभाची निळी निळाई
रवी केशर खलवी त्यात
पानांची सळसळ गोड
झुलवीत फुटे पहाट!!
दिवसा लख्ख प्रकाशी
उरतो ना एकही रंग
फुटतात पाय वाटेला
जीवनात जीवन दंग!!
संध्येची धूसर छाया
बिलगते मनाला थोडी
करतात प्रश्न नव्याने
गतकाळातील कोडी!!
कोण अलगद रात्री
चांदण्या पेरूनी जाते
पांघरुन चमचम शेला
पात्र नदीचे निजते!!
स्वप्नात भास-आभास
सांगतात जीवन हे रे
तुज जगायचे नव्याने
उघडून मनाची दारे!!
मी मानसी