कधी हसणं राहून जातं
कधी रडणं राहून जातं
कधी मरता मरता थोडं
हे जगणं राहून जातं
कधी रांगणं राहून जातं
कधी पळणं राहून जातं
कधी चालता चालता ठेच लागून
पडणं राहून जातं
कधी असणं राहून जातं
कधी नसणं राहून जातं
या असण्या-नसण्याच्या पायी
ते शोधणं राहून जातं
कधी भोगणं राहून जातं
कधी सांगणं राहून जातं
कधी लिहिता लिहिता बरंच काही
लिहिणं राहून जातं
-पियुष जोशी....
लपून रहात नाही...
आनंदाचा बुरखा
पांघरुनही माझ्या
चेहऱ्यावरचे दु:ख
लपून रहात नाही...
मित्र-सख्यांच्या सहवासात
हास्यविनोदाच्या कल्लोळात
काळवंडलेला माझा चेहरा
लपून रहात नाही...
कामाच्या धबडग्यात
स्पर्धेच्या या जगात
माझी निरिच्छता
लपून रहात नाही...
नातेवाईकांच्या घोळक्यात
त्यांनी दिलेल्या आधारात
माझे अनाथपण
लपून रहात नाही...
जगायला तर हवेच
हसायला तर हवेच
त्या हसण्यातले माझे अश्रू
लपून रहात नाहीत...
*
अहमद आणि त्याचे दोन-तीन मित्र आपल्या मेंढ्यांना घेऊन जवळच्या कुरणाकडे निघाले होते. गावापासून थोड्याशा अंतरावर असलेल्या एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटासा पाण्याचा झरा होता. त्या पाण्यामुळे तिथे एक छोटंसं हिरवं कुरण तयार झालेलं होतं. गावातले लोक आपल्या शेळ्या-मेंढ्यांना , उंटांना आणि घोड्यांना तिथे चरायला घेऊन जायचे. त्या डोंगररांगांमध्ये असलेले छोटे छोटे पाण्याचे ओहोळ त्या गावासाठी वरदान ठरले होते, कारण तिथला पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा वाळवंटातल्या त्या गावासाठी अमृतासमान होता.
मज बोलावते ती खिडकी
झेलण्यास हा वारा
जसा भिने तो अंतरी
आठवी काळ माझा सारा....
मज शीळ घालतो पक्षी
करित आर्जव ही हसण्याची
अन आठवण होते मज
मी वर्तमानात असण्याची....
सांज होता अन
हा भास्कर क्षितिजी जातो
कराया शीतल माझे मन
अन शुभ्र चांदवा येतो....
मी पाहत राहतो फक्त
ती चांदणी शुक्राची
अन हसवते हळूच गाली
ती कोर मज चंद्राची....
उलटून जाते रातही
मी खिडकीला खेटूनी असे
अन पडता कोवळे ऊन उद्याचे
मज गाताना कोकिळा दिसे....
- पियुष जोशी
समृद्ध आयुष्य
शैशव सरले तारुण्य आले
मुग्ध कळीचे फूल झाले
छेडछाड वाऱ्यासंगे
अवखळ अल्लड प्रणय रंगे
सोन-हळदी रविकिरणे
स्पर्शित होती मुक्तपणे
गंध पसरता चोहीकडे
भुंगे किती घायाळ झाले
ऋतु मागुनि ऋतु गेले
पाने गळून प्रौढत्व आले
लालगुलाबी नाजूक मऊसर
तान्हुल्याच्या तळहातासम
नवीन पालवी नव क्षितिजावर
मातृत्व डोले अंगाखांद्यावर
वाऱ्यासंगे वृक्ष बोले
आयुष्य माझे समृद्ध झाले
आयुष्य माझे समृद्ध झाले
ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन, 'कोरोना'शी झुंज संपली.. भावपूर्ण श्रद्धांजली..
मजुरांचा तांडा
उदार होऊन आयुष्यवर
तांडा मजुरांचा रस्त्यावर
पोहोचे कधी अन् कसा
माहित नाही वस्त्यांवर
पोट भुकेले, नाही पाणी
कुटुंब निघाली अनवाणी
प्रखर उन्हे पाय भाजती
कोरोना-भुते मनी नाचती
किडामुंगीसम कधी मरती
देती जन्म कधी रस्त्याने
जन्म-मृत्यूचे तांडव बघती
जीवन जगती ही सस्त्याने
अंतिम यात्रा या मजुरांची
भाग्यवान तर घरला वापस
ना तर लढता मिळेल स्वर्ग
मरता रस्त्यावर हे बेवारस
कोठे माझा होतो ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)
तिच्या गुलाबी मिठीत जेव्हा होतो
सांगा ना....मी कोठे माझा होतो ?
तुलना अमुची कशी व्हायची होती
ती मंदिर..... मी पडका वाडा होतो
ती दिसली की बाकी काही नाही
आठवणींनी डोळा ओला होतो
खेळायाचे तर सगळ्यांना असते
वजीर कोणी..कोणी प्यादा होतो
निर्णयांमधे गफलत आधी होते
आयुष्याचा नंतर पचका होतो
आकार तुला कसा द्यायचा होता
मी रबराचा तुटका साचा होतो
देवळातला देव झोपतो तेव्हा
माणसातला माणुस जागा होतो
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा
अशक्य असली तरी
मनामध्ये रुजवत जा
नको करू चिंता उद्याची
रमू ही नको काळात तुझ्या
सांगड घाल दोन्हीची
आणि आज तुझा सजवत जा
जोरात पळू ही नको
आणि जागी एका थांबुही नको
दबक्या पावलांनी फक्त
वाटा तुझ्या तुडवत जा
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा