कोठे माझा होतो ?

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 16 May, 2020 - 05:35

कोठे माझा होतो ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)

तिच्या गुलाबी मिठीत जेव्हा होतो
सांगा ना....मी कोठे माझा होतो ?

तुलना अमुची कशी व्हायची होती
ती मंदिर..... मी पडका वाडा होतो

ती दिसली की बाकी काही नाही
आठवणींनी डोळा ओला होतो

खेळायाचे तर सगळ्यांना असते
वजीर कोणी..कोणी प्यादा होतो

निर्णयांमधे गफलत आधी होते
आयुष्याचा नंतर पचका होतो

आकार तुला कसा द्यायचा होता
मी रबराचा तुटका साचा होतो

देवळातला देव झोपतो तेव्हा
माणसातला माणुस जागा होतो

हिरवा, पिवळा, निळा, तांबडा, काळा
मी नक्की कुठल्या रंगाचा होतो ?

फुलासारखा वागत आहे हल्ली
कोणेकाळी मीही काटा होतो

अधिकचे काही शेर.....

ती लग्नाच्या आधी वेडी होते
अन् तो लग्नानंतर वेडा होतो

गुरूमुळे बस् जादा काही नाही
आयुष्याचा रस्ता सोपा होतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users