गरजा सगळ्या भागून जातील
तू थोडा तगून राहा
माणसंच तुझ्या कामी येतील
जरा भलं वागून राहा
चालायचंच आहे उद्या परत
आज घरी राहून पाहा,
होऊ शकते शब्दांची भ्रांत
आज सुचतायत, लिहून पाहा
कवितेतून व्यथा कसली मांडतोयस?
आर्त पीडितांचे पाश पाहा.
मुडदे मोजवे लागत नाहीयेत तुला,
यातच समाधानी हो, खुश राहा.
- मंगेश विर्धे
म्हणून ये बघायला
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
नको उशीर व्हायला म्हणून ये बघायला
नकोच साथ आपली अशीतशी सुटायला
ऋतू जसा सरायचा तसा निघून चाललो
उशीर लागतोच ना मनातुनी निघायला
नकोस देउ दु:ख वा नको नवीन वेदना
तुझी जुनीच आठवण पुरेल मज छळायला
उसंत बस् पुरेलशी कळीस दे फुलायला
कितीक वेळ लागतो सुवास दरवळायला ?
जसे सुचायचे सखे अधीर काव्य तुजवरी
हवा तसाच शेर बस् तुझ्यावरी सुचायला
कोरोनाचा फुत्कार
फुत्कार ऐकता कोरोनाचा
मन भयकंपित होते
नको नको त्या शंका
मन भुताचे घर होते
बातम्या ऐकून
इथल्या तिथल्या
मन दु:खी विचलित होते
घरात शिरता कोरोना पण
तारांबळ, घाबरगुंडी उडते
राव रंक वा असो भिकारी
खाजगी वा नोकर सरकारी
नाती गोती माती होती
नाही कुणी दरबारी
मदत कुणी कुणा
करू शकेना
एका हाती लढणे
असो म्हातारे वा तान्हुले
असहाय्यपणे पहाणे
इच्छाशक्ती, जगण्या भक्ती
शस्त्रच आपल्या हाती
शांत राहून घ्यावी काळजी
मनी नसावी भीती
प्रलय
जळी तुफान, 'निसर्ग' वादळी
आकाशी फिरे टोळांची टोळी
काय चालले काहीच कळेना
भूमीवर तर उभा दुष्ट कोरोना
झाडं उखडली घरं कोसळली
छपरं उडाली नभी पत्त्यापरी
बेघर झाली कितीक माणसे
संसार उघड्यावर रस्त्यावरी
टोळी टोळांची येई अचानक
करीत शेतातली पिके फस्त
धनधान्य गेले श्रमही लुटले
शेतकरी दीन,झाला उध्वस्त
कोरोना अजून शांत होईना
रोज हजारोंचे करतो भक्षण
मानवा कुणी न उरला वाली
कुणी करावे कुणाचे रक्षण?
सकाळचे दहा वाजले होते. विराज बेडवर झोपून विचार करत होता.
"वा! किती सुखद असतं ना, असं कोणतंही दुःख, चिंता न करता आरामात पडून राहणं! किती दिवसांनी हे आरामाचे क्षण नशिबात आले आहेत".
विराज एक आयपीएस ऑफिसर होता. स्पेशल इन्वेस्टीगेशन इंचार्ज…! दिवसरात्र केसमध्ये गुंतलेला! गुन्हेगारांच्या मागे पळण्यात आणि त्यांना बेड्या ठोकण्यातच त्याचा सगळा वेळ जायचा. कसले ड्युटी अवर्स नाहीत की कोणते विकली हॉलिडेज नाहीत! दिवसरात्र ऑन ड्युटी!
पावसात भिजणाऱ्यांच्या सुद्धा
अनेक categories असतात
बरसणाऱ्या सरी कोणाचा happiness
कोणाच्या worries असतात
कोणी शोधतं आडोसा
कोणी स्वतःला न्हाऊन घेतं
कोणी थांबण्याची बघतं वाट
कोणी भिजताना गाऊन घेतं
कोणाला बंधन असतं वेळेचं
कोणाची नसते इच्छा
चिंब भिजतं कोणी
कोणास असते शिक्षा
कोणी स्वतः भिजतो येथे
कोणी पाहून कोणाला बावरतो
कोणी सारतो स्वतःचे केस मागे
कोणी दुसऱ्याची बट सावरतो
वंदणारे हात, येथे मारणारे झाले
मानवच मानवतेचे, येथे क्रूर भक्षक हे झाले
पुंडलिकाची शक्ती येथे चालावी तरी कशी
त्यालाच पूजणारे येथे कलीरूप हे झाले
- पियुष जोशी
उगाच पापणी झरू लागली
सवाल बोचरे करू लागली
कुठून काळजा कशी वेदना
कथा जुनी जणू स्मरू लागली
अजून आसवे असे प्यायची
कुणास जाम तू भरू लागली
पडून जायचे कधी पावसा
सुकून रोपटे मरू लागली
वळून पाहतो कुणा चालता
निलेश वाट रे सरू लागली
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- वानरी
(लगालगा लगालगा गालगा)