कोठे माझा होतो ?
- महेश मोरे (स्वच्छंदी)
तिच्या गुलाबी मिठीत जेव्हा होतो
सांगा ना....मी कोठे माझा होतो ?
तुलना अमुची कशी व्हायची होती
ती मंदिर..... मी पडका वाडा होतो
ती दिसली की बाकी काही नाही
आठवणींनी डोळा ओला होतो
खेळायाचे तर सगळ्यांना असते
वजीर कोणी..कोणी प्यादा होतो
निर्णयांमधे गफलत आधी होते
आयुष्याचा नंतर पचका होतो
आकार तुला कसा द्यायचा होता
मी रबराचा तुटका साचा होतो
देवळातला देव झोपतो तेव्हा
माणसातला माणुस जागा होतो
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा
अशक्य असली तरी
मनामध्ये रुजवत जा
नको करू चिंता उद्याची
रमू ही नको काळात तुझ्या
सांगड घाल दोन्हीची
आणि आज तुझा सजवत जा
जोरात पळू ही नको
आणि जागी एका थांबुही नको
दबक्या पावलांनी फक्त
वाटा तुझ्या तुडवत जा
एकदा तरी असं म्हणत
स्वप्नं तुझी रंगवत जा
थांबेल भळभळ कधीतरी
- महेश मोरे (स्वच्छंदी),सातारा
8554085101
जखमा जुन्या भरतील अन् थांबेल भळभळ कधीतरी
बस् याचसाठी सोसतो.. संपेल ही कळ कधीतरी
थांबेल श्वासांची तलफ अन् एक वळवळ कधीतरी
त्याच्या जरा आधी गडे! तू ये मला छळ कधीतरी
छातीत खंजिर खोच तू अन् सांग बस् एवढे मला
पाठीवरी उठलेत ते मुजतील का वळ कधीतरी ?
तू दे कळीला जेवढी आहे हवी ती उसंत बस्
उमलेल फुल काट्यात अन् पसरेल दरवळ कधीतरी
धावतो आहे मागे तयाच्या जे न मजला पाहिजे,
मोह घालति वेड्या मनाला म्रुगजळाचे कवडसे.
ग्रासले आहे मला या जीवनाच्या यांत्रिकीने,
विसरलो आहे उराशी बांधलेली चार स्वप्ने.
विसरतो आहे वेदना काल झालेल्या मनाला,
उदरी क्षुधेच्या राक्षसाला मी जलाने जाळतो आहे.
विचारतो आहे सुखाचे अर्थ मी साऱ्या दिशांना,
जरी वाहणारे धुंद वारे मी सुखाने भोगतो आहे.
-----मयुरेश परान्जपे
जगण्याचे सोने करितो
असा परीसाचा स्पर्श आहे
माऊलीच्या कुशीत या
विश्वाचा हर्ष आहे
माणसामाणसांच्या लगदयातुन
ऊतू जाणारे आकार
मनाच्या बंदिस्त चौकटीत
मावतील तरी कसे?
फुफ्फुसातून फुटू पाहणारे
संवेदनांचे श्वास उच्छवास
मर्मबंधाच्या टाचेखाली
राहतील तरी कसे?
संस्करणाच्या नावाखाली
ताणलेले बाह्योपचार
संकोचणाऱ्या पापण्यांत
ठिबकतील तरी कसे?
आंदोळणाऱ्या ठोक्यांबरोबर
झुलणारी ध्येय वगैरेंची ठिगळे
टीचभर आश्वासनांवर
विसंबतील तरी कसे?
नशीब नेत राहिले.........!
- महेश मोरे (स्वच्छंदी)
मला उन्हात ठेवुनी कसे मजेत राहिले
नकोच जायला तिथे नशीब नेत राहिले
खुडून टाकले कुणी, कुणी जखम उरी दिली
उभ्या जगास तेच फुल सुगंध देत राहिले
असेच काल एकदा अधर चुकून चुंबिले
नि श्वास काळजातले तिच्या कवेत राहिले
जसा गझल लिहायला म्हणून शब्द शोधला
समोर नेमके तिचेच नाव येत राहिले
सुखांस भेटली अधीर वाहवा तुझी-तिची
नि दु:ख मैफलीत फक्त दाद देत राहिले
तो आणि ती
मद्याचा एकच प्याला
वेड लावितो दारुड्याला
तो ना सोडी वारुणीला
ती ना सोडी मग त्याला
वार्ता पसरली गल्लोगल्ली
दारूविक्री खुली जाहली
बंद दुकानी रांग जमली
सहा फुटांची वाट लागली
तळीरामांची एकच गर्दी
सचिंत झाली खाकी वर्दी
दारूविना घसा कोरडा
कुणी करो आरडाओरडा
पिऊन काहीही घसा गरम
दारुड्या ना लाज शरम
दारूविना मरणार नाही
मद्यप्यांनो करू नका घाई
कामधंदा, नाही नोकरी
बायको रडते, रडे छोकरी
मुलाबाळांची ना चिंता करी
माणसापरीस जनावरं बरी
कधीतरी एकदा
रात्र होईन म्हणतो
पुनवेच्या रातीचा
चंद्र होईन म्हणतो
भिरभिरणारा तो
एकदा वारा होईन म्हणतो
काळोखात बुडालेल्या आकाशात
लुकलूकणारा
एखादा तारा होईन म्हणतो
होईन म्हणतो एकदा
शांत निजलेली पाने
कधी मधुर आवाजातील एखादे
गाणे होईन म्हणतो
दिवसाला या तरी
नाम मात्र करीन म्हणतो
शांत, निर्मळ अशी एकदा
रात्र होईन म्हणतो