इलाज नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
आयुष्याला सलतो आहे..इलाज नाही
विरह तुझा मज डसतो आहे..इलाज नाही
जरी दिली तू टाळी नाही मला एकही
तुझी वाहवा करतो आहे..इलाज नाही
रस्ता बदलुन तू वळणावर वळल्यापासुन
नको तिथे मी वळतो आहे..इलाज नाही
तुला भेटले नाही घरटे हक्काचे अन्
मीही वणवण फिरतो आहे..इलाज नाही
चार विषारी दात काढले तेव्हापासुन
जो-तो येतो, छळतो आहे..इलाज नाही
इतकी वर्षे झाली पहिला गुलाब देउन
हात अता थरथरतो आहे..इलाज नाही
खालील फोटो पाहून सुचलेली कविता:
फोटो सौजन्य: फेसबूक पेज ऑफ ALDM Photography, Pune
ढासळला वाडा
ढासळला वाडा, पडक्या झाल्या भिंती
उगवल्या बाभळी त्यातून काटेच पडती
सरकले वासे, खिडक्यांनी जागा सोडल्या
दरवाजे करकरूनी, कड्या कोयंड्या तुटल्या
टणक होते जूनेर लाकूड, उन वारा पाऊस खाऊन
भुगा केव्हाच झाला त्यांचा, अंगी खांदी वाळवी लेवून
जमीन मुकी झालीय
शुष्क फांद्यांवर दुःखी झालेली
पाखरे गप्प सगळं ऐकताय
रात्रीच्या नग्न शरीरावर
झोपेचे उलटे प्याले सांडताय
मेलेल्या मुडद्यांचा वास
फुलांच्या बगिच्यात पसरलाय
मृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधून
समुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरून
म्हतारी खिडकीतून ओरडतेय
तिला कुठला धर्म लगाम घालेल आता?
कोणत वरदान गळा घोटेल तिचा?
त्या म्हतारीला सांगा
तिचा रोल संपलाय
आता पडदा पडेल
नाटक संपल
पण
खिडकीबाहेर मृत्यू तसाच फिरतोय!
©प्रतिक सोमवंशी
मलाच मीही सवाल केले
कठीण काही जहाल केले
कसे कळाले मला न हेही
कधी मला तू हलाल केले
हळूच ओझे दिलेस माथी
विवंचनेचे हमाल केले
करू म्हणालो हिशेब जेव्हा
कशास खोटे बवाल केले
विकून आलो नशीब ज्यांना
सुखास त्यांनी दलाल केले
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- जलौघवेगा
( लगालगागा लगालगागा )
भिजून जावे म्हणतो
©®- महेश मोरे(स्वच्छंदी)
पापणीतल्या थेंबांमध्ये भिजून जावे म्हणतो
मी जाताना तुझी आसवे पुसून जावेे म्हणतो
काठावरती येण्याचीही नको व्हायला इच्छा
प्रेमामध्ये तुझ्या एवढे बुडून जावे म्हणतो
पडदाबिडदा अन् टाळ्यांची वाट कशाला पाहू ?
मी शेवटच्या घंटेआधी निघून जावे म्हणतो
नको एवढ्या निर्दयतेने डाव मोडला माझा
आयुष्या मी तुलाच आता पिसून जावे म्हणतो
उच्चप्रतीचे अत्तर होणे असेल ज्याच्या नशिबी
त्याने पुरत्या आनंदाने सुकून जावे म्हणतो
छकुली आणि कोरोना
हे करू ना, ते करू ना
काय करावं काही कळेना
रस्त्यावरही कुणी दिसेना
कित्ती कित्ती वाईट कोरोना
आई झाली मोलकरीण बाई
बाबा लॅपटॉपचा गुलाम होई
नावाला फक्त घरात असती
खेळण्या माझ्याशी कुणी नाही
थकून भागून ती आल्यावर
पटकन मला कुशीत घ्यायची
समोर आता दिसत असूनही
चोरी झाली कुशीत शिरायची
बाबाचे तर सांगू काय?
दिवस न रात्री कामच काम
सकाळी उठून पप्पी नाही
उठल्याउठल्या चिडतो जाम
अर्ध्यात गेली ओतून सारे
संसार माझे मोडून सारे
लक्षात आले आता इशारे
झाले असावे बोलून सारे
साचून जावे आभाळ डोळा
निश्वास आता रोखून सारे
आक्षेप का ते काही उरावे
आलो जरी मी खोडून सारे
खोट्या जगाचे खोटे बहाणे
प्यालो कसे मी कोळून सारे
कोणास त्रागा कोणा अचंबा
आहे उभा मी सोसून सारे
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त :- स्वानंदसम्राट
(गागालगागा गागालगागा)
पण...बोलत नाही
- महेश मोरे (स्वच्छंदी)
माझ्याबद्दल कधी कुणाला सांगत नाही
वळून बघते, हसतेही पण...बोलत नाही
एक चांदणी लुकलुक करते..अन् मावळते
त्याच अदेवर चंद्र रात्रभर झोपत नाही
तिला पाहिजे तसा तसा मी बदलत गेलो
अन् ती म्हणते मनासारखा वाटत नाही
खरे सांगतो..बाई म्हणजे असा डोह की
जन्म संपतो..थांग कुणाला लागत नाही
मी दिसलो की उगाच कुजबुज कुजबुज करते
वेळ बदलते..स्वभाव काही बदलत नाही
जशी यायची.. तशीच येते पाणवठ्यावर
मी ही असतो पाय तिचा पण घसरत नाही