छकुली आणि कोरोना

Submitted by Asu on 25 May, 2020 - 13:30

छकुली आणि कोरोना

हे करू ना, ते करू ना
काय करावं काही कळेना
रस्त्यावरही कुणी दिसेना
कित्ती कित्ती वाईट कोरोना

आई झाली मोलकरीण बाई
बाबा लॅपटॉपचा गुलाम होई
नावाला फक्त घरात असती
खेळण्या माझ्याशी कुणी नाही

थकून भागून ती आल्यावर
पटकन मला कुशीत घ्यायची
समोर आता दिसत असूनही
चोरी झाली कुशीत शिरायची

बाबाचे तर सांगू काय?
दिवस न रात्री कामच काम
सकाळी उठून पप्पी नाही
उठल्याउठल्या चिडतो जाम

आजीआजोबा थकले फार
खाण्यापिण्याचे फक्त लाड
दंगामस्ती थोडी केली तर
हसून म्हणती पोरगी द्वाड

मित्र-मैत्रिणी भेटणे नाही
खेळण्याचे तर दारही बंद
रात्रंदिवस विचार करते
करावा आता कुठला छंद

कोरोना म्हणे माणसं खाई
खरंखोटं माहित नाही
खेळणे पळणे नकोच बाई
घरातच मी लपून राही

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

Group content visibility: 
Use group defaults