भिजून जावे म्हणतो

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 26 May, 2020 - 11:25

भिजून जावे म्हणतो
©®- महेश मोरे(स्वच्छंदी)

पापणीतल्या थेंबांमध्ये भिजून जावे म्हणतो
मी जाताना तुझी आसवे पुसून जावेे म्हणतो

काठावरती येण्याचीही नको व्हायला इच्छा
प्रेमामध्ये तुझ्या एवढे बुडून जावे म्हणतो

पडदाबिडदा अन् टाळ्यांची वाट कशाला पाहू ?
मी शेवटच्या घंटेआधी निघून जावे म्हणतो

नको एवढ्या निर्दयतेने डाव मोडला माझा
आयुष्या मी तुलाच आता पिसून जावे म्हणतो

उच्चप्रतीचे अत्तर होणे असेल ज्याच्या नशिबी
त्याने पुरत्या आनंदाने सुकून जावे म्हणतो

मरायचे तर नक्की आहे वेळ तशी आल्यावर
कसे जगावे हे त्याआधी शिकून जावे म्हणतो

वादामध्ये जेव्हातेव्हा तुझेच खोटे पचते
मी माझेही सत्य जरासे पचून जावे म्हणतो

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users