जाळं भाग १ (थरारकथा)

Submitted by मोरपिस on 7 June, 2020 - 05:10

          सकाळचे दहा वाजले होते. विराज बेडवर झोपून विचार करत होता.
"वा! किती सुखद असतं ना, असं कोणतंही दुःख, चिंता न करता आरामात पडून राहणं! किती दिवसांनी हे आरामाचे क्षण नशिबात आले आहेत".
          विराज एक आयपीएस ऑफिसर होता. स्पेशल इन्वेस्टीगेशन इंचार्ज…! दिवसरात्र केसमध्ये गुंतलेला! गुन्हेगारांच्या मागे पळण्यात आणि त्यांना  बेड्या ठोकण्यातच त्याचा सगळा वेळ जायचा. कसले ड्युटी अवर्स नाहीत की कोणते विकली हॉलिडेज नाहीत! दिवसरात्र ऑन ड्युटी!
           विराजचं लग्न होऊन सहा महिने झाले होते. पण आतापर्यंत ड्युटीमुळे  त्याला त्याची बायको नीरजाबरोबर मनसोक्त वेळ घालवायला मिळाला नव्हता, ना ते दोघं कुठे फिरायला गेलेले. एक चांगलं होतं की नीरजा समजूतदार बायको होती. तिला पतीचा नाईलाज आणि कामाचं गांभीर्य कळत होतं. पण जेव्हा नीरजाचा बड्डे जवळ आला तेव्हा विराजने त्याचे सिनिअर मिस्टर शेट्ये यांना एका आठवड्यासाठी वॅकेशन अप्रुव करायला कंन्वीन्स केलं. लगेचच दुसऱ्या दिवशीची फ्लाईट पकडून त्यांनी गोव्याला जायचं ठरवलं. गोव्यामध्येच विराजचा कॉलेज फ्रेंड गौतमचं रिसॉर्ट होतं. गौतमने विराजला खूप वेळा त्याच्या रिसॉर्टला येण्यासाठी इंवाईट केलं होतं. जेव्हा खुद्द विराजने आपण गोव्याला येत असल्याची खबर द्यायला त्याला कॉल केला तेव्हा गौतम आनंदात उड्या मारत म्हणाला
"वा! काय मस्त टायमिंग निवडलयस गोव्याला यायला! तुला माहितेय का? आपले मित्र संतोष आणि विनीतसुद्धा त्यांच्या वाईफसोबत येणार आहेत माझ्या रिसॉर्टमध्ये".
विराज आनंदात म्हणाला,"दॅट्स गुड…पण असं अचानक? कोणतं स्पेशल ऑकेजन आहे वाटतं?"
"अगदी बरोबर ओळ्खलंस! तीन दिवसांनी माझ्या रिसॉर्टला पाच वर्ष पूर्ण होतायत. त्याच दिवशी माझी लविंग वाईफ रुहीचा बड्डे आहे. मी तुला इंविटेशन कार्डसुद्धा पाठवलंय. आज संध्याकाळपर्यंत मिळेल बहुतेक! पण तुम्ही या फ़ंक्शनला याल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि तेही तुझ्या वाईफला घेऊन!"
"आता मला कार्ड मिळो, न मिळो! मी तर येणारच! ओके! सी यु टूमॉरो!"
          आज सकाळी चार वाजताच्या फ्लाईटने विराज त्याची वाईफ निरजाला घेऊन गोव्याच्या 'रिसॉर्ट सी व्यु'ला पोहोचला. गौतमने आधीच त्यांची रूम तयार ठेवली होती. विराज आणि नीरजाने रूममध्ये जाऊन कपडे बदलले आणि लगेचच झोपी गेले. सकाळी दहा वाजता विराज उठला. नीरजा अजूनही साखरझोपेत होती. झोपलेल्या नीरजाचा चेहरा न्याहाळत असताना त्याला लक्षात आलं की आज तो पहिल्यांदाच निरजाला इतकं निरखून पहात होता. निरजाच्या चेहऱ्यावरही आनंद ओसंडून वाहत होता. तिच्या चेहऱ्यावर अस्ताव्यस्त विखुरलेले कुरळे केस तिच्या सुंदरतेत अजूनच भर घालत होते. विराजने प्रेमाने तिच्या केसात हात फिरवत तिला हाक मारली
"नीरजा! नीरजा उठ ना ग! बघ किती वाजले!"
"विराज प्लिज! झोपू दे ना मला! मला खूप झोप येतेय!" नीरजा आळसावलेल्या स्वरात म्हणाली.
'ओके बेबी! तू झोप अजून थोडावेळ. मी रिसॉर्टची चक्कर मारून येतो".
          विराज फ्रेश होऊन, कपडे बदलून रूमच्या बाहेर आला. रिसॉर्टच्या लॉनमध्ये फिरताना विहानचं तनमन प्रसन्न झालं. तेवढ्यात त्याला समोरून गौतम, संतोष आणि विनीत येताना दिसले. विराजला पाहताच तिघांनी विराजला धावत जाऊन मिठी मारली.
गौतम म्हणाला,"काय यार! आम्हा सगळ्यांना विसरलास रे तू! गेल्या पाच वर्षात तुला बघितलंसुद्धा नाही आम्ही".
विनीतसुद्धा प्रशंसा करत म्हणाला,"मानलं पाहिजे तुला विराज! अजूनसुद्धा तू स्वतःला मस्त मेंटेन ठेवलंयस. आम्ही आमच्या कामाच्या व्यापात आमचा फिटनेसच गमावून बसलोय".
संतोष विराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"अरे, आपला विराज तर आता मोठा पोलीस ऑफिसर झालाय! त्याला फिटनेसची काळजी तर घ्यायलाच हवी ना?""
विराज म्हणाला ,"फिटनेससाठी पोलीस ऑफिसर बनणं गरजेचं नाही. ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीसाठी फायद्याची आहे.
गौतम मध्येच म्हणाला,"आता हे फिटनेस पुराण बंद करा आणि चला ब्रेकफास्ट करूया. मी आज तुमच्याबरोबर ब्रेकफास्ट करण्यासाठी सकाळपासून तुमची वाट बघतोय".
विराज म्हणाला,"चला लवकर! मलापण भूक लागलेय".
          तिथे एका बाजूला स्विमिंग पुलजवळ गौतमने ब्रेकफास्टची सोय केली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या स्नॅक्स आणि ड्रिंक्सने टेबल भरलं होतं.
विराज आनंदात म्हणाला,"वॉव, आज बऱ्याच दिवसांनी निवांत ब्रेकफास्ट करायला आणि मित्रांसोबत वेळ घालवायला मिळाला आहे".
गौतम म्हणाला,"मला आपल्या कॉलेज ट्रिपचे दिवस आठवले. तेव्हा असंच आपण चौघे मिळून तासनतास एकत्र वेळ घालवायचो".
संतोष हसत म्हणाला,"पण आता आपण एकटे नाही आहोत. आपल्या वाईफ़सुद्धा आपल्या बरोबर आहेत".
गौतम म्हणाला,"डोन्ट वरी! मी त्यांच्यासाठी शॉपिंग आणि आउटिंगचा असा प्लॅन केला आहे, ज्यात त्या तिघी त्यातच बिझी राहतील".
संतोष टाळी वाजवत म्हणाला,"वा!हे बरं केलंस तू! नाहीतर पूर्ण वॅकेशन फक्त त्यांच्या शॉपिंग बॅग पकडून मागे मागे फिरण्यात आणि यस बेबी, यस बेबी करण्यात गेलं असतं".
चौघही मनमोकळे हसले.
"कोणत्या गोष्टीवरून एवढं मोठ्याने हसलं जातंय! जरा मलाही कळू दे" अचानक स्विमिंग पुलमधून कुणीतरी बाहेर येत विचारलं.
          सगळेजण वळून स्विमिंग पुलच्या दिशेने पाहू लागले. तिथे एक स्विमसुट घातलेली सुंदर, स्लिमट्रिम तरुणी पाण्याबाहेर येऊन त्यांच्या दिशेने जाऊ लागली. तिच्या गोऱ्या रंगावर ब्लु कलरचा स्वीमसुट आणि त्याच्यावर पिंक कलरचा टॉवेल इतका सुंदर दिसत  होता की जसा दवबिंदूत भिजलेला गुलाब…!
तिला पाहताच विनीत लगेच खुर्चीवरून उठला आणि तिच्याकडे जायला निघाला. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"मीट माय वाईफ… तनिष्का! आणि तनिष्का! हे माझे कॉलेज फ्रेंड्स… गौतम, संतोष आणि विराज!"
सगळ्या मित्रांनी तनिष्काला हॅलो म्हटलं आणि तनिष्का काही बोलणार इतक्यात विनीत पटकन म्हणाला,"तनिष्का, जा! लगेच कपडे बदलून ये. नाहीतर थंडी वाजेल तुला!"
          तनिष्का काहीही न बोलता रूमच्या दिशेने निघून गेली.गौतमची नजर दूरपर्यंत तिचा पाठलाग करत होती. ही गोष्ट विराजच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. तेवढ्यात गौतमचा मोबाईल वाजला. तो मोबाईलवर बघून म्हणाला,"सॉरी! रुहीचा कॉल आहे". आणि तो थोडं लांब जाऊन बोलू लागला. पाच मिनिटांनी जेव्हा तो बोलून परत आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती.
विराज उठत म्हणाला,"बराच वेळ झालाय. बहुतेक नीरजा उठली असेल आता. मी रूममध्ये जाऊन येतो. मग लंचला भेटू सगळे परत. आणि तिथे संध्याकाळचा प्रोग्रॅमसुद्धा फिक्स करूया!"
"ओके विराज!" म्हणून बाकीचे सगळे फ्रेंड्ससुद्धा आपापल्या रूममध्ये जाण्यासाठी उभे राहिले.
विराज अचानक मागे वळून गौतमला म्हणाला,"यार, तुझ्याशी जरा बोलायचं होतं! ते बर्थडे पार्टीविषयी! उद्या आपल्या दोघांच्याही वाईफचा बर्थडे आहे. काहीतरी खास प्लॅन तर झालाच पाहिजे ना!"
गौतम जवळ येत म्हणाला,"मला माहितेय यार! तू नको काळजी करू. माझ्या रिसॉर्टचा मॅनेजर रेहानने सगळं सेट करून ठेवलंय".
तेवढ्यात विराज गौतमच्या अगदी जवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला,"हे बघ गौतम! तू आगीशी खेळतोयस!"
"काय? काय म्हणतोयस तू विराज? मला नाही समजलं. कसली आग? "
'तनिष्का जी! तनिष्का जींबद्दल बोलतोय मी! माफ कर. पण बहुतेक तू विसरलायस की मी एक पोलीस ऑफिसर आहे. लोकांच्या नजरा वाचता येतात मला. आणि तुला तर कॉलसुद्धा आलेला ना तनिष्का जींचा!"
"कॉल? तो कॉल तर रुहीचा होता".
"खोटं…! मी पहिली होती तुझ्या चेहऱ्यावरची चमक आणि डोळ्यातले भाव!"
"सॉरी यार! पण प्लिज, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच ठेव".
विराज त्याच्या खांद्यावर हात ठेवत मऊ आवाजात म्हणाला,"हे काय मला सांगायला हवं. अरे, तू माझा फ्रेंड आहेस म्हणून मी तुला कोणत्या संकटात पडलेलं नाही बघू शकत. मी आशा करतो की यापुढे तू तनिष्का जींपासून दूर राहशील".
एवढं बोलून विराज त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला.

          गौतमच्या रिसॉर्टला आलेल्या विराजचं वॅकेशन आनंदात जाईल का? त्याची वाईफ नीरजा आणि गौतमची वाईफ रुहीचं बर्थडे फ़ंक्शन व्यवस्थित ऑर्गनाईझ होईल ना? कोणतं संकट तर त्यांची वाट बघत नसेल ना?

क्रमशः

(तुम्हाला हा भाग कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया कळवा. आणि पुढील भागात काय होईल याचे अंदाज बांधत रहा. पुढील भाग लवकरच!)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults