प्रेमतीर्थ
कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।
भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।
होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।
भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।
देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।
सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....
मिराशी - परंपरागत हक्क
सगुण ब्रह्म
वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा
भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने
धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत
चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....
चांदोमामा गोरा पान.... बाळ किती नाजूक छान
चांदोमामा ढगांमागे..... बाळ अजून कसे जागे
चांदोमामा गोल गोल .... बाळा बाळा डोल डोल
डोल डोल डोलताना
बाळ मुठी मिटताना
गाई गाई करताना
वळवळ चळवळ थांबताना
डोळे गेले मिटून
बाळ गुर्कन झोपून.....
प्रवासी
ट्रेनमधे शिरल्यावर मोकळे बाक मिळाल्यावर जो काय आनंद होतो तो त्यासमच. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आसपासचे प्रवासी कसे आहेत हे बघत असतानाच समोरचा फकीरासारखा माणूस मला एकदम विचारता झाला - आपका इस्मेशरीफ ?
ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।
तुटो प्रपंचाची गोडी । जडो विठ्ठली अावडी ।
नावडो हे धन मान । नको तृष्णा विषयपान ।
येर सारे वाव नुरो । ह्रदी विठ्ठल संचरो ।
येई येई पांंडुरंगा । घेई घेई रे वोसंगा ।
निके प्रेमाचे भातुके । देई देई रे इतुके ।
----------------------
वाव -- खोटे, व्यर्थ
वोसंगा --- मांडी
निके -- खरे, शुद्ध
भातुके -- खाऊ, खाद्यपदार्थ
अंगाई
पाळण्यात चिऊताई
करीतसे गाई गाई
चांदो अाला अाकाशात
नीज कशी येत नाही
तारका या अाकाशात
झोपल्या गं किती गुणी
अजूनिया का गं जागी
अाज माझी परीराणी
खेळूनिया लपाछपी
चांदोबाही झोपी गेला
निंबोणीच्या झाडामागे
पार दिसेनासा झाला
नीज येते पापणीत
चळवळ थांबेना ही
मंद मंद झुलवून
अाई गातसे अंगाई
नीज येई डोळ्यावर
तरी खेळायचे हिला
झुलवून थके पार
डोळा अाईचा लागला..
रंग चितारी अाभाळावर जाताना दिनकर
लाजलाजुनी नवथर संध्या मोहरली तिथवर
काजळ किंचित भिरभिरले अन् पापणीत थरथर
ओष्ठद्वय रंगता उमलले गुलाब गालांवर
पदर जांभळा उचलून पाही हळूचकन् प्रियवर
दारातून ती पहात असता गेला कि झरझर
कृष्णवस्त्र हिरमुसून ओढी पुरते अंगावर
लुकलुकणारी एक चांदणी उमटे क्षितिजावर......
कृष्ण सावळा तो राधेचा कुठे हरवला तरी
व्याकुळलेली दिसे बावरी फिरते यमुनातीरी
सूर कुठे पाव्याचा घुमतो कान देऊनी उभी
झुळझुळणारा वारा वाहे नादावून ती खुळी
चमकून बघता अाभाळीचा मेघ शामवर्णी
कान्हा कान्हा शब्द विराले निश्चळ ती रमणी
मेघ थबकला माथ्यावरती राधा फुटली ऊरी
अलगद सुटता भान तयाचे बरसे वरचेवरी
चिंब भिजूनिया कृष्णप्रेमिका अंतरात श्रीहरी
जळ यमुनेचे कृतार्थतेने लोळे चरणांवरी
नाम घेता तुकोबांचे ।।
नाम घेता तुकोबांचे । ह्रदी रुजतसे साचे । बीज भक्ती वैराग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।१||
फिका वाटतो संसार । मुखी येते नित्य थोर । एक विठ्ठल नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।२॥
अास अंतरी जागते । ओढ विठूची लागते । अाम्ही भाग्याचे भाग्याचे । कैसे देणे तुकयाचे ।।३॥
ओढ लागतसे मना । कुणी भेटवा सज्जना । संगे गजर नामाचे । कैसे देणे तुकयाचे ।।४॥
गाथा ह्रदया निववी । हाता धरोनी चालवी । पिसे लागे अभंगांचे । कैसे देणे तुकयाचे ।।५॥
पुरे जाहला लौकिक । नसे मुक्तिचे कौतिक । द्यावे भातुके प्रेमाचे । माथा नमवूनी साचे ।।६॥