विठोबा

प्रेमतीर्थ

Submitted by पुरंदरे शशांक on 4 July, 2017 - 06:16

प्रेमतीर्थ

कर कटावरी । उभा तो पंढरी । भक्तांसी हाकारी । प्रेममूर्ति ।।

भक्तांसी केवळ । वाटतो निर्मळ । गोड प्रेमजळ । मुक्त हस्ते ।।

होवोनी सुस्नात । पावन तीर्थात । भक्त अानंदात । विरालेचि ।।

भक्तांची मिराशी । एक प्रेमराशी । प्रपंच विनाशी । नाठविती ।।

देव सुखावला । भक्तांसी फावला । प्रेमभाव भला । अासमंती ।।

सत्संगे अाकळे । येरव्ही नाकळे । भक्तांसी सोहळे । प्रेमतीर्थी ।।

जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल....

मिराशी - परंपरागत हक्क

सगुण ब्रह्म

Submitted by पुरंदरे शशांक on 23 June, 2017 - 02:29

सगुण ब्रह्म

वारकरी होऊ चला
तुळशीच्या कंठी माळा
तुका—माऊली साथीने
निघे गोपाळांचा मेळा

भावे गाऊया भजने
एकमेका लोटांगणे
नामघोष सप्रेमाने
टाळ वीणा संकीर्तने

धन्य संत संगतीत
दोष गेले, शुद्ध चित्त
विठू मावेना मनात
येतो अापैसा वाणीत

चंद्रभागा उचंबळे
भक्त सागर हेलावे
ब्रह्म सगुणता पावे
युगे अठ्ठावीस उभे.....

अवघे सावळ

Submitted by पुरंदरे शशांक on 29 June, 2016 - 02:44

अवघे सावळ

उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||

चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||

अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||

कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||

मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||

तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||

विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||

'विठोबा'

Submitted by dr.sunil_ahirrao on 11 July, 2014 - 01:56

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

पारखोनी घे जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा

शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

डॉ.सुनील अहिरराव

मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2013 - 04:59

मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....

आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....

Subscribe to RSS - विठोबा