वृक्ष वल्ली आम्हा सोयरे
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे
फाल्गुनात उजाडता
तुका जाई भंडार्याला
चुकविला नित्य नेम
कान्हा अचंबित झाला
भंडार्याच्या माथ्यावरी
तुका कुर्वाळी वृक्षाला
भले तुमच्या संगती
विठू किर्तनी नाचला
काय वानू मैतर मी
केली निरागस प्रिती
द्यावा निरोप जी आता
जाई सखयाच्या पाठी
टप टप पाने गाळी
वृक्षराज गहिवरे
काय तुकयाला झाले
बोल लागती जिव्हारे
जाणूनिया वृक्षभाव
तुका प्रेमाने न्याहाळी
पांडुरंगे केली कृपा
आईकली माझी आळी