बहुरुपी तुकोबा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2016 - 00:17

बहुरुपी तुकोबा !!

नटनाट्ये अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥१॥
मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥२॥
तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ॥३॥५६४

पूर्णकाम तुकोबांचा हा अभंग त्यांचा एक विलक्षण पैलू उलगडून दाखवतो. बुवांच्या ठिकाणी अगदी सुरुवातीला निर्माण झालेली विठ्ठलभेटीची कमालीची आर्तता, व्याकुळता आता पूर्ण निवाली आहे. आता बुवा स्वप्नातून पूर्ण जागे झाले आहेत (अवेअर झालेले आहेत Happy ), या जीवनाचे कोडे त्यांना उलगडलेले आहे. असे प्रत्यक्ष विठ्ठलरुप (ब्रह्मरुप) झालेले तुकोबा आता एखाद्या बहुरुप्यासारखे जीवन जगताहेत, अतिशय अलिप्तपणाने या अफाट रंगभूमीवर चाललेल्या खेळाकडे मोठ्या कौतुकाने पहात आहेत. या खेळातील स्वतःची जी बहुरुपी भूमिका आहे त्याचे वर्णन बुवा या अभंगात करीत आहेत. अतिशय प्रक्टिकल पद्धतीने मांडलेला पण तरीही अतिशय गंभीर भावाचा हा अभंग. स्वतःकडेच एखाद्या तिर्‍हाईतासारखे बुवा कसे काय पहात असतील ??

देहभाव पूर्णपणे टाकून देऊन आत्मभावावर स्थिर झालेले बुवा म्हणताहेत - आमचे मूळ रुप आम्ही जाणले आहे (आम्ही आता आत्मस्वरुपाकार झालेलो आहोत - आपुलें स्वरूप जाणतसों). आता हा संसार जणू एखाद्या खेळासारखा झालाय, नाटकासारखा झालाय. यात जी भूमिका आमच्या वाट्याला येईल ती अशी निभावू की खेळाचा रंग तर बिघडणार नाहीच, उलट खेळ अजून रंगतदार होईल अशीच काळजी घेऊ.

याला जे उदाहरण (प्रमाण) बुवांनी दिले आहे ते ही मोठे मार्मिक आहे. अतिशय पारदर्शी असा स्फटिक असावा, त्याला ज्या काही लाल, पिवळ्या कपड्यावर ठेवला असता तो जसा तेवढ्या काळापुरता लाल, पिवळा भासावा तसे आमच्या वाट्याला जी काय भूमिका येईल ती आम्ही तेवढ्यापुरते ते सोंग घेऊन पार पाडू.
तो स्फटिक लाल कपड्यावरुन काढला की जसा पूर्वीसारखा पारदर्शी दिसतो तसे आम्हीही त्या प्रसंगातून बाहेर पडलो की पुन्हा आत्मरुपात स्थित होऊन जाऊ. (तो लाल, पिवळा वगैरे रंग ही त्या स्फटिकाची वरवरची उपाधी आहे, मूळ स्वरुप पाहिले तर तो स्फटिक पारदर्शीच आहे.)

किती विलक्षण अवस्था - या स्थितीची आपण कल्पना तरी करु शकतो का ??

एखादा कसलेला नट जसा त्याच्या वाट्याला आलेली भिकार्‍याची भूमिका असो वा एखाद्या सम्राटाची भूमिका असो - दोन्हीही अशा सादर करतो की प्रेक्षकही त्याला मोठी दाद देतात - की वाह, काय समरसून भूमिका सादर केली तुम्ही - खरे नटश्रेष्ठ आहात बुवा ....
अगदी तस्सेच बुवांचे झाले आहे-
कीर्तन करताना कीर्तनकाराच्या (उपदेशकाच्या) भूमिकेत, आवलीबरोबर पतीच्या भूमिकेत, मुलांबरोबर पित्याच्या भूमिकेत असे समरसून जीवन जगत होते की बाहेरुन पहाणार्‍याला वाटावे की वा, हे पण बायकोबरोबर आपल्यासारखेच वाद घालताहेत की - प्रसंगी मुलांवर ओरडताहेत आणि "मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे" म्हणताना कमालीचे उग्रही वाटताहेत.

पण आतमध्ये बुवा पक्के जाणून आहेत की ना मी पती आहे, ना पिता ना कीर्तनकार - मी तर केवळ आत्मरुप होऊन राहिलो आहे - जशी वेळ येईल तसतशा भूमिका पार पाडतो आहे झालं ...

अमृतधारा या आपल्या अतिशय छोटेखानी ग्रंथात स्वामी स्वरूपानंद पूर्णकाम झाल्यावर नेमके असेच उद्गार काढताना दिसतात -
मजसि ह्या जगद्-रंगभूमिवर जसें दिलें त्वा सोंग
करीन संपादणी तशी मी राहुनिया नि:संग ||५१||

स्वामीजी म्हणत - जसे आपले पेन, टोपी, रुमाल तसे हे मन, ही बुद्धी, हा देह आहे. आपण ब्रह्मरुपच आहोत आणि ही आपल्याला दिलेली विविध साधने - वाटली तर वापरु नाहीतर बाजूला ठेवून देऊ... Happy (हे वाचताना, लिहिताना असे वाटते - किती ही विलक्षण नि:संगता !!!)

तुका म्हणे आम्ही या जनाविरहित । होऊनि निश्चिंत क्रीडा करूं ||
सर्वसामान्यांची मनस्थिती आणि अति उंच स्थानावर पोहोचल्यावरची बुवांची ही निश्चिंत स्थिती याची काही तुलनाच करता येत नाही. बुवा आता जनांमध्ये वावरत असतानाही एकांतात आहेत, जनविरहित अवस्थेत आहेत. भगवद्गीतेत वर्णन केलेली पद्मपत्रमिवांभसा अशा स्थितीत पोहोचले आहेत. पद्मपत्र म्हणजेच कमळाचे पान जसे पाण्यातच असते पण पाण्यापासून पूर्ण अलिप्त तसे अलिप्तपण बुवा उपभोगत आहेत. आसपासचा हा सारा प्रपंच जणू त्यांचे क्रीडास्थान. अतिशय अलिप्तपणे ते या सार्‍या संसाराकडे पाहू शकताहेत, स्वतःचे अलिप्तपण न सोडता ते जणू इथे वावरत आहेत, क्रीडताहेत.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबाबतची एक गोष्ट - त्यांचे एक शिष्य नारायणराव यांचे ज्ञानेश्वरीवर अतिशय प्रेम. सहाजिकच नारायणरावांच्या नित्य वाचनात ज्ञानेश्वरी होती. एकदा महाराजांचे काही नातलग महाराजांबरोबर वाद घालू लागले. पाहाता पाहता त्या वादाने चांगलेच उग्ररुप धारण केले. त्या नातलगांचे आवाज वाढू लागले आणि ते नातलग जसजसे महाराजांच्या अंगावर धावून येऊ लागले तसतसे महाराजही रागाने तांबडेलाल होत त्यांना प्रत्त्युत्तर देऊ लागले. ते पाहून नारायणरावांच्या मनात आले - हे कसले महाराज !! आपल्यासारखेच बेभान होऊन भांडताहेत की !! त्यांनी आपल्याजवळची ज्ञानेश्वरी उघडली - त्यातील काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः (अ. ३, श्लोक ३७) यावरील ज्ञानेश्वरीतील भाष्य -
तरी हे काम क्रोधु पाहीं| जयांतें कृपेची सांठवण नाहीं| हें कृतांताच्या ठायीं| मानिजती ||२४०||
हे ज्ञाननिधीचे भुजंग| विषयदरीचे वाघ| भजनमार्गींचे मांग| मारक जे ||२४१||

हे भाष्य नारायणरावांनी काढले आणि महाराजांसमोर धरीत त्याचा अर्थ महाराजांना विचारु लागले. त्याबरोबर थोडी मान नारायणरावांकडे वळवून अतिशय हळू आवाजात महाराज त्यांना म्हणाले - एवढे नाटक पार पडले ना की सांगतो.. चालेल ??

नारायणराव एवढे चकित झाले की बस्स... वरवर पाहता अतिशय क्रोधायमान झालेला हा महापुरुष अंतर्यामी एवढा परमशांत आहे की हे आपल्याला जाणवू देखील नये !! त्यामुळेच आपल्याला अगदी समजावल्यासारखे सांगतो आहे - हे नाटक चालू आहे ना !! मग मला त्यातली भूमिका नीट मन लावून पार पाडली पाहिजे...
नारायणरावांना एवढेच कळले की महाराजांची अंतरस्थिती आपल्याला जाणता येणे हे केवळ अशक्य.

बुवादेखील याच पद्धतीने जीवन जगत होते, आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्या त्या परिस्थितीनुसार निभावत होते - आतील अलिप्तता न मोडता...
भगद्गीतेमधे भगवान गोपालकृष्णांना जेव्हा अर्जुनाने विचारले की स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे तेव्हा भगवान मनात नक्की म्हणाले असतील - अरे, तुकोबांना, माऊलीला आणि अशाच आत्मरुप झालेल्या कुठल्याही साधू-संताला..

अशी विदेही अवस्था आपल्यालाही प्राप्त व्हावी अशी साधी इच्छा जरी कोणाच्या मनात निर्माण झाली तर बुवांना ही गाथा लिहिल्याचे सार्थक झाले असे वाटेल ...
आणि कोणी एखादा भाग्यवान जर अशा विदेही स्थितीची साधना करायला लागला, बुवांच्या चरणी नतमस्तक होत त्यांची करुणा भाकू लागला तर अतिशय उदार बुवा त्याला दूर थोडेच लोटतील !!

बुवांच्या पवित्रचरणकमली पुन्हा पुन्हा प्रार्थना ..... देहभाव झडझडून जावो, आत्मभाव जागो...

------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शशांक, सुंदर! गोंदवलेकर महाराजांचा प्रसंग तर खरच कायम ध्यानात ठेवण्यासारखा आणि त्यावर मनन करण्याजोगा आहे.

'बहुरुपी तुकोबा !!' ह्या शीर्षकानेच कुतुहल चाळवलं नी लेख वेगे वेगे वाचून काढला .
सध्याच्या माबोवरील थोडया तप्त सैराटलेल्या वातावरणात हे लेखन वळवाच्या सरींगत आल्हादायक शिडकावा करून गेल आहे.त्यासाठी धन्यवाद !

Awesome! शशांक सर मी तुमचे निरूपणं बऱ्याच आधीपासून वाचते. It's very enlighting and motivating. आणि तुम्ही असे कठीण अभंग किती सोपे करून सान्गता. त्यासाठी खूप धन्यवाद. तुम्ही teacher/professor आहात का? Happy

आणि तुम्ही असे कठीण अभंग किती सोपे करून सान्गता. त्यासाठी खूप धन्यवाद.>>>>>> +१!

छान लिहिता तुम्ही पुरंदरे.
आणखिन वाचायला आवडेल. Happy

छान निरुपण.
ज्यांना हे साधले त्यांना अखंड, निर्मळ, आनंदावस्था प्राप्त झाली असेल.
फार कठीण आहे असे करता येणे. माझ्या अल्प समजा वरून असे वाटते की आधी क्रोध, अहंकार पूर्णपणे नष्ट करता आले पाहिजेत, मगच इतरांच्या वागण्या बोलण्याकडे निर्विकार वृत्तीने पहाता येईल.

मुळात कुठलीहि अध्यात्मिक ध्येयासाठी प्रथम षड्रिपूंना काबूत आणून हळू हळू नष्ट करायला पाहिजेत, त्या शिवाय काहिहि कठीण.

माधव, भुईकमळ, दिनेशदा, वैद्यबुवा, मानुषी, स्वाती२, सोन्याबापू - सर्वांचे मनापासून आभार.... बुवांवर तुमचे जे निस्सिम प्रेम आहे त्यामुळेच माझे हे वेडेवाकुडे बोल तुम्ही मंडळी गोड मानून घेत आहात... ___/\___

सुलक्षणा - मनापासून धन्यवाद... मी कोणी शिक्षक वा प्राध्यापक नाही, बुवांचे अभंग काय, ज्ञानेश्वरी काय हे सर्व मराठी भाषिकांचा अनमोल ठेवा आहे - त्याचा अभ्यास व जमेल तसे मनन, चिंतन करण्याचा माझा प्रयत्न असतो...

खरे तर बुवा हेच आपल्या सार्‍यांचे शिक्षक, प्राध्यापक इतकेच काय सद्गुरु आहेत - त्यांची वचने आपण सार्‍यांनीच अभ्यासावीत, आचरण्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करावा यासाठी या लेखनाचा (प्रकट चिंतन) मी उपयोग करतो..... थोडक्यात, बुवांचे निखळ प्रेम लाभावे इतकाच या लेखनाचा हेतू ...

बुवांचे प्रेम सार्‍यांनाच लाभावे ही बुवांचरणी प्रेमळ विनवणी.. __/\__

सोन्याबापू - तुम्हाला हे लेखाण आवडले याचा खूप आनंद आहे, कृपया ते सर, साहेब म्हणून लाजवू नका... माझ्यालेखी तुमच्यासारखी सैन्यदलातील व्यक्ति सगळ्यात आदरणीय आहे - तुमचे व कर्नल चितळे साहेब यांचे सर्व लिखाण मला अतिशय आवडते - तुम्हा सर्वांना कायम सलामच ... ____/\____

नन्द्या४३ -

<<<<माझ्या अल्प समजा वरून असे वाटते की आधी क्रोध, अहंकार पूर्णपणे नष्ट करता आले पाहिजेत, मगच इतरांच्या वागण्या बोलण्याकडे निर्विकार वृत्तीने पहाता येईल.

मुळात कुठलीहि अध्यात्मिक ध्येयासाठी प्रथम षड्रिपूंना काबूत आणून हळू हळू नष्ट करायला पाहिजेत, त्या शिवाय काहिहि कठीण. >>>>>

तुम्ही म्हणताय ते अगदी खरे आहे. बुवा त्यांच्या साधकावस्थेत अतिशय सावधतेने साधना करीत होते, या षड्रिपूंना काबूत आणण्यासाठी विठ्ठलाची अतिशय आर्ततेने विनवणी करीत होते. आणि अशी साधना करीत करीत सिद्धावस्थेत पोहोचल्यावर त्यांची अंतरस्थिती काय होती हे सांगणारा वरील अभंग आहे. (साधकावस्थेतील नाही)

साधकावस्था - क्षणाक्षणा सांभाळितो | साक्षी होतो आपुला || १३७४||
निवैर होणे साधनाचे मूळ || १४२३||
असे उदाहरणादाखल काही अभंग देत आहेत, असे अनेक अभंग गाथेत सापडतील.

धन्यवाद.

अतिशय सुंदर निरुपण !
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥
असे खरेच व्हायला हवे.

फारच सुंदर. खास तुमच्या करिता खालील चारोळी लिहली .

शब्द अलंकारे भाव सुंदर ।
वर्णावे वचन तुकांचे फार
अध्यात्माची गोडी लागता थोडी
पोचती पैलतीर नाव जीवात्माची ।।

@पुरंदरे शशांक,
सहज म्हणून मायबोली उघडले आणि तुमचा सुंदर लेख वाचायला मिळाला.
हा धागा वरती आला हे फार छान झाले.
मस्त लिहीलंय.

फक्त नंद्या४३ यांना दिलेल्या उत्तराबद्दल थोडेसे.
उन्मनी अवस्थेनंतर ती अवस्था पचणे आवश्यक असते. ती पचल्यानंतर सिध्दावस्था येते. त्यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात मनाला सतत बजावत राहायला लागते. या पचनाच्या काळातला हा अभंग असावा.

तुकाराम महाराजांचा साधनेचा वेग खूप मोठा आहे. अवघ्या ८-९ वर्षात ते सिध्दावस्थेत पोहोचले. त्यामुळे त्यांच्या अवस्थांची सरमिसळ होऊ शकते. मुख्य म्हणजे असे अत्यंत वेगाने प्रगती करणारे महापुरूष, सिध्दावस्थेनंतर देहांत जास्त काळ रहायला तयार नसतात. असो.

गोंदवलेकर महाराजांचा प्रसंग मात्र सिध्दावस्था प्राप्त झाल्यानंतरचा आहे.
_/\_