वृक्ष वल्ली आम्हा सोयरे

Submitted by पुरंदरे शशांक on 20 March, 2019 - 23:33

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे

फाल्गुनात उजाडता
तुका जाई भंडार्‍याला
चुकविला नित्य नेम
कान्हा अचंबित झाला

भंडार्‍याच्या माथ्यावरी
तुका कुर्वाळी वृक्षाला
भले तुमच्या संगती
विठू किर्तनी नाचला

काय वानू मैतर मी
केली निरागस प्रिती
द्यावा निरोप जी आता
जाई सखयाच्या पाठी

टप टप पाने गाळी
वृक्षराज गहिवरे
काय तुकयाला झाले
बोल लागती जिव्हारे

जाणूनिया वृक्षभाव
तुका प्रेमाने न्याहाळी
पांडुरंगे केली कृपा
आईकली माझी आळी

होळी पुनव संपता
नेण्या येईल विठ्ठल
नका मनी कष्टी होऊ
वारी झाली की सफळ

वार्‍यासवे भरारत
घेईन मी गळामिठी
पर्जन्याच्या रुपे पुन्हा
भेटेनचि तुम्हाप्रति

विश्वात्मक झाला तुका
सांगे खूण पिंपुरणी
गाथा प्राशूनिया तृप्त
अमृतचि इंद्रायणी

..................................................

कान्हा.... तुकोबांचा धाकटा भाऊ

भंडारा.... देहू गावाजवळील डोंगर, जिथे तुकोबा परमार्थ साधनेसाठी नित्य जात असत.

आळी..... हट्ट

सांगे खूण पिंपुरणी.... फाल्गुन वद्य बीजेला म्हणजेच तुकाराम बीजेला देहू गावात इंद्रायणी डोहाच्या बाजूला असलेला पिंपुरणी हा पुरातन वृक्ष अजूनही थरारतो/डोलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तुकोबा या वृक्षाच्या छायेत बसले असतानाच अचानक नाहीसे झाले असे म्हणतात. (काहींच्यामते कीर्तन करीत असताना ते अचानक गुप्त झाले.)
( तुकोबा सदेह वैकुंठाला गेले अशीही भाविकांची श्रद्धा आहे )

——————————
श्री तुकोबारायांचरणी शिर साष्टांग दंडवत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निव्वळ अप्रतिम!
शशांकदा हे सहज सुचने शक्य नाही. ही नुसती काव्यप्रतीभा नाहीए. कुठेतरी तुकोबांशी समरस झाल्याशिवाय असले काही लिहिताच येणार नाही.
भारी

अ प्र ति म! _/\_ घ्या .
शशांकदा हे सहज सुचने शक्य नाही. ही नुसती काव्यप्रतीभा नाहीए. कुठेतरी तुकोबांशी समरस झाल्याशिवाय असले काही लिहिताच येणार नाही>> अगदी पटलंय

अप्रतिम .......
नमन नमन
"मन साशंक नसावे
जैसे देणे तुकयाचे
तैसे शशांके लिहावे
शिर तेथे नमायाचे"
हेच खरे.....

__/\__