विनवणी
विनवणी
क्षणाक्षणाला पडतो खाली
उठुनी पुन्हा उचलतो पाऊली
नसे साथीला दिसे कुणीही
रणरण अवघी नसे सावली
बघुनी सारे राजमार्ग ते
वाटबिकटशी हीच निवडली
तुम्हासारखे दिग्गज कोणी
कधी चालले याच दिशेनी
केशर-बुक्का खुणा पाहुनी
दिशा हीच ती नाही चुकली
गाथेमधल्या शब्दांना मी
कधी मस्तकी उरी सांभाळी
त्या बोलाच्या साथीने तर
चालतोच ही वाट निराळी
आळी पुरवा एक एवढी
करी विनवणी माथा लवुनी
नसेल उत्कट भाव तरीही
घ्या ओढूनी घ्या हो जवळी
-------------------------------