तीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे |
नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर ||
कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥१॥
तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥
दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥२॥
नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥३॥
नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृत्ति ॥४॥
नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥५॥
नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥६॥
नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥७॥
नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥८॥
नाहीं जाळीत भणदीं । उदो म्हणोनि आनंदी ॥९॥
नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥१०॥
आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥११॥
नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥१२॥ गाथा - २७२ ||
तुकोबा जे काही बोलतात ते अगदी सरळसोट आणि परखडही. या अभंगात ते स्वतःविषयी काय काय सांगताहेत पहा - माझी काही शिष्यशाखा नाही का मठ नाही. मी काही जडीबुटी जाणत नाही का मंत्रतंत्र जाणत नाही. कोणाला मोहिनी घालणे, कोणाचे उच्चाटण करणे असल्या अघोरी विद्या माझ्यापाशी नाहीत - असे सांगणारा हा अभंग. बुवांचे सगळे कामच अगदी पारदर्शी होते. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा - असे सांगणारे बुवा काय कोणाला मंत्रतंत्र सांगणारेत !
एक धरिला चित्ती | आम्ही रखुमाईचा पति | अशा बुवांना विठ्ठलाशिवाय दुसरे कुठलेही दैवत प्रिय नव्हते. त्या विठ्ठलप्रेमात पूर्ण रंगलेले बुवा जेव्हा किर्तन करीत तेव्हा त्यांच्या मुखावाटे अभंगांचा निर्मळसा प्रपात असा वहात असणार की त्या श्रीरंग- रंगात श्रोते अगदी चिंब न्हाऊन निघत असणार. अशा प्रेमळ तुकोबांना बुवाबाजी मात्र अजिबात पसंत नव्हती, या बुवाबाजीवर ते असे कोरडे ओढत होते.
आजच्यासारखीच त्याकाळातही काही विचित्र मंडळी कपटाने सर्वसामान्यांना भुलवीत होतीच - बुवा म्हणतात मी त्यातला नाही. मी पांडुरंगाचे गुणवर्णन करणारे कीर्तन करणारा. जडीबुटीतले मला काही कळत नाही, ते मी देत नाही, चमत्काराला मजपाशी काहीयेक स्थान नाही.
माझी शिष्यशाखा नाही, अयाचित वृत्तीचा आहे - कोणाकडे काही न मागणारा. माझा कुठला मठ नाही का काही इनाम जमिनीतून मिळणारे उत्पन्न मजपाशी नाही.
माझ्या मालकीचे काही देऊळ नाही की त्या अनुषंगाने मांडलेला काही बाजार नाही. काही जणांना जसा वेताळादि कोणी प्रसन्न्/वश असतो (तो काही खाणाखुणा सांगतो) तसे माझे काही नाही.
मी पुराणिकही नाही (जो स्वतः लोकांना सांगतोय मोठे ब्रह्मज्ञान पण त्याचे वागणे त्या सांगण्याच्या अगदी विपरीत)
घटापटाचे वाद घालणारा मी करंटा पंडितही नाही.
हातात जळता पोत घेऊन उदो उदो म्हणून नाचणारा मी नाही.
माझ्या गळ्यात विचित्र माळा नाहीत की जेणेकरुन भोळेभाबडे लोक माझ्याकडे आकर्षित व्हावेत.
बुवाबाजीला कुठून सुरुवात होते आणि त्याला कसा आळा घालायचा याचा जणु वस्तुपाठच बुवांनी या अभंगातून घालून दिलाय. परमार्थाची सुरुवातच मुळी प्रपंच ठाकठीक करण्यासाठी आहे अशा वृत्तीची भक्त(?)मंडळीच अशा बुवाबाजीला बळी पडतात. अशा मंडळींना ताळ्यावर आणण्यासाठी बुवा निक्षून सांगताहेत की असले भलतेसलते मी सांगत नाही आणि प्रपंचातले काही देतही नाही.
बुवा स्वतः कीर्तने करीत पण अतिशय व्रतस्थतेने ---
जेथे कीर्तन करावे | तेथे अन्न न सेवावे |
बुका लावू नये भाळा | माळ घालू नये गळा |
तटावृषभासी दाणा | तृण मागो नये जाणा |
तुका म्हणे द्रव्य घेती | देती ते ही नरका जाती ||३०७४||
बुवांचे सारेच वागणे "आधी केले मग सांगितले" अशा स्वरुपाचे. विरक्ति अशी काही बाणलेली की दारी चालून आलेली संपत्तीदेखील यत्किंचित लोभ न ठेवता परत पाठवलेली. रिद्धीसिद्धी सुखे हाणितल्या लाथा | तेथे या प्राकृता कोण पुसे - अशा कमालीच्या निस्पृह वृत्तीचे बुवा. विठ्ठलप्रेमापुढे त्यांना कुठल्याही मानापानाची, संपत्तीची क्षिती नव्हती.
आजच्या काळातही ज्या कोणाला खराखुरा परमार्थ समजावून घ्यायचा आहे त्यांनी तुकोबा, समर्थ, माऊली, एकनाथमहाराज, गोंदवलेकरमहाराज, स्वामी स्वरूपानंद आदी संत काय म्हणतात ते नीट पहाणे आवश्यक आहे. आणि नुसता त्याचा शाब्दिक अर्थ समजाऊन घेण्यापेक्षा त्यात सांगितलेली भगवद्भक्ति आपल्या अंतःकरणात कशी येईल हे पहाणे त्याहूनही महत्वाचे आहे. संतसमागम वा सत्संगती ती हीच - अजून काहीही नाही.
------------------------------------------------------------------------------------------------
छान संपादन
छान संपादन
सुंदर.. दिवाळीच्या आठवणीत
सुंदर..
दिवाळीच्या आठवणीत सकाळी रेडीओवर लागणारे किर्तन हे महत्वाचे आहे माझ्यासाठी. बरीच वर्षे ते ऐकलेले नाही पण हे वाचून अगदी तसाच आनंद झाला.
सुंदर
सुंदर
खुप सुरेख विवेचन शशांक. आज
खुप सुरेख विवेचन शशांक. आज वाचलं हे. असं काही वाचलं की छान वाटतं.
सर्व तुकोबाप्रेमींना मनापासून
सर्व तुकोबाप्रेमींना मनापासून धन्यवाद ...
राम कृष्ण हरि
वाह... सुंदर विवेचन _/\_
वाह... सुंदर विवेचन _/\_
बुवाबाजीला कुठून सुरुवात होते
बुवाबाजीला कुठून सुरुवात होते आणि त्याला कसा आळा घालायचा याचा जणु वस्तुपाठच बुवांनी या अभंगातून घालून दिलाय. परमार्थाची सुरुवातच मुळी प्रपंच ठाकठीक करण्यासाठी आहे अशा वृत्तीची भक्त(?)मंडळीच अशा बुवाबाजीला बळी पडतात. <>>>>>>>>
खरचं बुवांना त्याकाळी बुवा म्हटलेले चालायचे का? आणि लोक म्हणतच असतील तर ते रुढार्थी बुवा नव्हेत हेच खरे. बुवांसारखे अक्षय सुखाचा मार्ग दाखविणारे बुवा विरळाच.
या बुवांना आपण कोण आहोत हे
या बुवांना आपण कोण आहोत हे अतिशय स्पष्ट माहीत होते व निर्भीड, बेडर वृत्तीने सगळ्याला सामोरे गेले. जितेंद्र जोशींचा संत तुकाराम चित्रपट पाहून तुकाराम अजून चांगले समजले.
बुवा म्हणजे मार्गदर्शक, अध्यात्माच्या वाटेवरील दिशादर्शक, सदाचरणी व्यक्ती. आताच्या काळातील बापू, महाराजांप्रमाणे त्या काळात देखील दांभिक बुवा असतीलच.
त्यांचे पितळ महाराजांनी उघडे पाडलं आहे.