शब्दसाम्राज्यींचा राजा
शब्द गाथा वेलीवर
फुले बहरासी येती
परिमळ दाहीदिशा
लोक वेडावून जाती
शब्द कधी आर्तभरे
मधु साजिरे गोजिरे
राग अनावर होता
रौद्र रुपाही नावरे
शब्द झुंजती धडक
विठ्ठलासी थेट धाक
कधी पायी लोळुनिया
विठू अंकी पहुडत
शब्द कडाडे आसूड
जनलोका सुनावत
कधी पाठीवरी हात
चंदनाला लाजवीत
शब्द साम्राज्यींचा राजा
तुकाराम चक्रवर्ती
शब्द सारोनिया मागे
भाव वैकुंठा पोचती
शब्द सारे अलौकिक
वर्णवेना बालकासी
शब्द विरता उराशी
सावळीच कासाविशी
विठू कृपा भागिरथी
सरसर धारावाणी
भाव वर्षाव गाथेत
डोह इंद्रायणी शिरी
दिमाखाने मिरवत
शब्द अमृती न्हाऊनी
मना संजीवनी देत
कधी रपाटा पाठीत
हसू गालात खेळत
अभंगांनी खुळावोनी
धरी मौन वेद चारी
लोकामुखी वसोनिया
गाथा आकाशा बाहेरी
विठू कृपा भागीरथी
तुका झेली अवलिळे
देव मिरवी कौतुके
हार तुळशी झळाळे
.............................
अवलिळे.... सहज , लीलया
..............................
तू चि गा विठ्ठल....
गाथेमाजि स्वये । ठायी ठायी देखा । नित्य पाठीराखा । दीनबंधू ।।
शब्दाशब्दांतून । जागवी साधका । हात देसी निका (चांगला, सुयोग्य ) । भाविकांसी ।।
सगुण निर्गुण । आम्हा विलक्षण । दाविसी तू खूण । नेमकीचि ।।
वैराग्याचे फळ । भक्ति भाव प्रेम । दान अनुपम । काय वर्णू ।।
वैकुंठीचा राणा । अवतरे शब्दी । सकळही सिद्धी । पावलीसे । (प्राप्त झाली) ।।
नसे थोर काही । आम्हालागी अन्य । मायबाप धन्य । तूंचि आम्हा ।।
तूंचि गा विठ्ठल । प्रेमचि केवळ । सोयरा सकळ । जिवलग ।।
अवघे सावळ
उतरले पूर्ण | तुकोबा जीवन | यथार्थ दर्शन | गाथेमाजी ||
चिंतनी मननी | भक्तांसी तुकोबा | नवल विठोबा | करीतसे ||
अभंग तुक्याचे | निरखी विठ्ठल | मनी कुतुहल | फार दाटे ||
कैसी ही आगळी | भक्तिची माधुरी | शब्दी खरोखरी | सामावेना ||
मिटूनी नयन | बैसे स्वस्थचित्त | श्रीहरि एकांत | भोगतसे ||
तुकोबा तुकोबा | गजर अंतरी | आनंद सागरी | देव बुडे ||
विठ्ठल का तुका | तुका कि विठ्ठल | अवघे सावळ | एकरुप ||
संतांचे उपकार
भक्तासाठी देव | होतसे प्रगट | येरा तो अदृष्ट | आकळेना ||
भाव ऐसा थोर | देवापायी नित्य | जीवभाव सत्य | लुप्त होई ||
आठविता चित्ती | एकमात्र हरि | लौकिक विसरी | पूर्णपणे ||
वेड लागे देवा | भक्ताचेच पूर्ण | सांडिले निर्गुण | अरुपत्व ||
ठाकतसे उभा | भक्ताचे ह्रदयी | निर्गुण सामायी | सगुणत्वे ||
आकळावे वाटे | कोणासी श्रीहरि | अभंग उच्चारी | सप्रेमाने ||
ज्ञानेश्वरी गाथा | मनन - चिंतन | स्वये नारायण | दृष्य होई ||