शब्दसाम्राज्यींचा राजा

Submitted by पुरंदरे शशांक on 8 May, 2019 - 00:56

शब्दसाम्राज्यींचा राजा

शब्द गाथा वेलीवर
फुले बहरासी येती
परिमळ दाहीदिशा
लोक वेडावून जाती

शब्द कधी आर्तभरे
मधु साजिरे गोजिरे
राग अनावर होता
रौद्र रुपाही नावरे

शब्द झुंजती धडक
विठ्ठलासी थेट धाक
कधी पायी लोळुनिया
विठू अंकी पहुडत

शब्द कडाडे आसूड
जनलोका सुनावत
कधी पाठीवरी हात
चंदनाला लाजवीत

शब्द साम्राज्यींचा राजा
तुकाराम चक्रवर्ती
शब्द सारोनिया मागे
भाव वैकुंठा पोचती

शब्द सारे अलौकिक
वर्णवेना बालकासी
शब्द विरता उराशी
सावळीच कासाविशी

.......................
अंकी .... मांडीवर
आसूड .... चाबूक
......................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुकोबांच्या काव्यप्रतिभेचे अगदी यतार्थ वर्णन.
कविता वाचता वाचताच तुकोबांचे काही अभंगही डोळ्यापुढून सरकले.
सुरेख जमली आहे अगदी.

खूप सुरेख. ..

शब्द झुंजती धडक
विठ्ठलासी थेट धाक
कधी पायी लोळुनिया
विठू अंकी पहुडत

विशेष आवडले.

कविता वाचता वाचताच हे आठवले

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू

अहाहा...
सुंदरच..

आणि
"शब्द विरता उराशी
सावळीच कासाविशी" हे तर खासच..