स्वरकाफिया

'विठोबा'

Submitted by dr.sunil_ahirrao on 11 July, 2014 - 01:56

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

पारखोनी घे जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा

शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

डॉ.सुनील अहिरराव

Subscribe to RSS - स्वरकाफिया