गोत्र माझे भागवत
आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला
दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास
भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश
तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून
विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात
वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....
मग तू अवघाचि सुखरुप होसी ....
वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....
आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....
नटुनिया विभ्रमांनी
कविता ही पानोपानी
नाद लय रंगातुनी
पिंगा घाली माझ्या मनी ll १ ll ll
संगे हसुनी खेळूनी
कधी रडूनी झुरुनी
भान अवघे सुटुनी
आलो आनंद भुवनी ll २ll ll
शब्द नवीन जुन्यांचे
कधी तुमचे नि माझे
शब्द गूढ अनवट
सोपे सरळ सोट ll ३ ll ll
हात घालूनिया हाती
जेव्हा नवे रूप घेती
अर्थ धुमारे फुटती
नव्या पाहता दृष्टी ll ४ ll ll
अहो शब्दाचिया बळे
कवी ज्ञानोबाची बाळे
धन्य तया स्फूर्तीलागे
वर चिरंजीव मागे ll ५ll ll
विक्रांत प्रभाकर