मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2013 - 04:59

मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....

आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....

या अशा ज्येष्ठातल्या भारलेल्या वातावरणात अचानकच मेघ पाझरु लागतात तसा तुझा आठव येतो तो का बरं ? तूहि तसाच काळासावळा आहेस म्हणून का तूहि तसाच दयार्द्र, भक्तिप्रेमात चिंब भिजवून टाकणारा आहेस म्हणून ??

- तो भिजलेल्या रानातून येणारा एक आगळाच गंध थेट तुझ्या गळ्यात रुळणार्‍या तुळशी-हाराचीच आठवण का करुन देतोय बरं ??

- सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला दिसणारी आकाशींची रंगबिरंगी जादूहि तुझ्या जादूगिरीचीच का बरं आठव करुन देते ??

सगळ्याच मराठी मनांना, पावलांना तुझे वेध लागतात या पावसाबरोबरच - काय गारुड आहे रे हे तुझं ?

कोणाचंही बोलावणं नसताना एवढ्या मोठ्या संख्येनं ही मंडळी तुझ्याकडे कशी काय येतात ??

ती हि चालत, चालत .... - नाही, नाही, अगदी आनंदानं, उड्या मारत, खेळत -पार फुगड्या घालत, नाचत-बागडत, तुझ्या नामाचा जय घोष करत .....
म्हणजे चालण्याचे श्रम तर जाऊंदेत पण या चालण्याचा एक मोठ्ठा सोहळाच होऊन जातो पार ...

काय तुझी करणी आहे कळतंच नाही बघ ...

ही करणी तुझी का तुझ्या जीवलगांची तेहि कळेनासं होतं मग - काय ते तुकाराम, ज्ञानोबा.... तुझ्या वर्णनात देहभान हरवून बसलेत - इतरांनाही त्यात सामील करुन घेताहेत .... सगळे अडाणी-विद्वान, गरीब -श्रीमंत, स्त्री-पुरुष हे सारे सारे तुझ्या ओढीने जे निघतात तो आनंदाचा नुसता जल्लोष असतो सारा ....

ते दिंड्या-पताकांचे भार, त्या तुळशीच्या माळा, ती मुद्रांकित दर्शने, तो टाळांचा घुळघुळाट, तो मृदंग घोष, तो वीणा-नाद, ते अभंग, ती कीर्तनं - ते एकमेकांच्या पाया लागणं... कधी तुझा नामघोष तर कधी संतांचा जयजयकार.... आहा हा हा हा... पृथ्वीतल रहातच नाही मग - वैकुंठमय होऊन जातं सारे आसमंत ....

ज्या मार्गावरुन हे सारे चालतात त्यावर या संतदर्शनासाठी होणारी ही ऽ गर्दी ..
पूजा, हार्-तुरे, मुक्कामावर होणारी भजन्-कीर्तनं .... सगळाच एक आनंदोत्सव ...
पण सगळं कसं शिस्तशीर - कुठेही गोंधळ नाही का गडबड नाही - एका अज्ञात अनुशासनात चालणारा हा सोहळा ... त्या त्या तिथीला ठरलेला मुक्काम, ठरलेले चालणे, ठरलेली रिंगणे आणि आनंदाने भरुन राहिलेली मने .... एक अनाम तृप्तीच सार्‍या वातावरणात भरुन राहिलीये जणू ..

कितीएक वरुषे लोटली हे सगळं असं चालूच आहे, चालूच रहाणार ...

हा जल्लोष पहायला मग देशोदेशींचे लोकही येतात -कोणी नुसतं बघायला येतात, कोणी कोणी सामील व्हायला येतात, कोणी त्याचा अभ्यास करायला तर कोणी चित्रपटही काढायला येतात...

एक-दोन दिवस नाही - पार अठरा-वीस दिवस ही सगळी सगळी मंडळी आपल्या वाटची सगळी सुखं-दु:खं, सगळे व्याप्-ताप -सगळं सगळं विसरुन का ओढले जातात तुझ्याकडे ??

काय नेमकं आहे रे तुझ्याकडे - ना तू कटीवरचे हात कधी वर उचललेस ना कोणाकडे कधी डोळे उघडून का होईना पाहिलेस ....
.... तरी सगळे धावताहेत तुझ्याकडे -

अरे, तुझे दर्शन तर होत नाहीच त्या एकादशीला -पण तुझ्या राऊळाच्या कळसाचे दर्शन घेऊन धन्य होताहेत हे सगळे - पार समाधान पावताहेत ....

बरं - एवढा आटापिटा करुन तुझ्याचरणी माथा टेकून तुझ्याकडे मागतात तरी काय - कोणी नवखे असतील, अजाण असतील तर मागत असतील बिचारे पाऊसपाणी, मान्-पैसा अन् असंच काहीबाही.

पण जे जाणते आहेत, अनुभवी आहेत ते म्हणतात - अरे, तुम्ही काय मागणार आणि तो तरी काय देणार ?? इथे सगळा प्रेमाचा व्यवहार - प्रेम द्या- प्रेम घ्या - इतकी दुर्लभ गोष्ट सोडून कशाला त्या नाशिवंत गोष्टी मागून राहिलात ? त्या तुकोबांनी नाही काही मागितलं, ते ज्ञानाचे ईश्वर - ज्ञानोबा - ते नाही काही लौकिक मागत आणि तुम्ही काय मोठे शहाणे त्यांजपुढे ??
संसार म्हटला की सुख-दु:ख आलीच की त्यात. दु:खाचं ओझं वाहताना जी काही घालमेल होते ती सारी या विठूरायामुळेच हलकी होईल रे बापांनो. इथे जो काही कस लागतो तो याच्या कृपेमुळेच - एरव्ही हे जिणं शेळ्यामेंढ्यांच्याही खालंच - पार पाषाणाचेच होऊन जाईल की रे .... साक्षात माऊलींचे प्रमाण आहे रे हे - माझिया भक्तिविण | जळो ते जियालेपण | पृथ्वीवरी पाषाण | नसती कायी ||
या सगळ्या संतांनी हा भाव-भक्तिचा मळा फुलवलाय त्यात मस्त हरवून जायचे - आणिक काय दुसरं सार्थक आहे या जीवनात ?
सुखालागी करिसी तळमळ | तरि तू पंढरीसी जाय एकवेळ | मग तू अवघाचि सुखरुप होसी || - असं सुखरुप होण्यासाठी या सोहळ्यात सामील व्हायचं - बस्स..

अशा सगळ्या जाणत्या-नेणत्यांना वेड लावणारा कोण आहेस रे तू ????

ती सगळी संत मांदियाळी तर तुला आनंदनिधान, परब्रह्म, प्रेममूर्ति म्हणून राहिलेत तर बाकीचे कोणी कोणी पंढरीनाथ म्हणून हाक घालतंय तर कोणी विठूमाऊली म्हणून खेव देऊ पहाताहेत .....
.... नक्की कोण आहेस रे तू ??

कोणी म्हणे - आई-वडिलांची जीवभावे सेवा करणारा कोणीयेक पुंडलिक आणि त्याजपुढे येऊन उभाच्या उभा ठाकलेला तू येक ... येका विटेवर अठ्ठावीस युगे उभा असलेला ...

तर कोणी म्हणे त्या गाई-गुरांच्या मागे मागे फिरणारा जो गोकुळीचा कान्हा तोच हा ....

तू - एक न संपणारं कोडं ....
तू - एक कृष्णलाघव ....
तू - एक सगुण-निर्गुणाच्या रेघेवरचा ....
तू - एक अनादि अनंत ....
तू - सतत अर्धोन्मिलित दृष्टीने पहाणारा आणि न पहाणाराहि ....
तू - मुखावर सतत एक अनाम स्मित हास्य बाळगून असणारा ....
तू - सगळ्या संतांची भावभक्ति आपल्या उरीशिरी धरुन ठेवणारा ....
तू - कितीदा दर्शन घेऊनही ह्रदयात एक आस सतत जागवाणारा ....
तू - या विराट जगताचा खेळ मांडून राहिलेला एक अद्वितीय खेळिया ...
तू - सर्वांना आधार वाटणारी एक प्रेममूर्ति - विठूमाऊली ....
.....तू असा, तू तसा ....
.
.
....अशा सगळ्या उपाधींसह शोभणारा तू आणि त्या उपाधींपलिकडलाही तूच तू....
.... तूच तू .....

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल ..... पांडुरंग हरि, वासुदेव हरि ....

हरि ॐ तत सत ||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतरीचा भाव |शब्दी उगवला |
अरुपी रंगला |शशांक हि |
रूपाचा धरुनी |भाव भक्ती हात|
निर्गुणाची वाट |चोखाळली|
तुज तुझे लाभो |कैवल्य भोगण |
मागतो मागण |पांडुरंगा|

लेख खूप आवडला ,असेच लिहित राहा .

डोळे पाणावले ! भाव खुप सुंदर व्यक्त झाले आहेत.. खरंच अशा अक्षर, अनादि विठूमाऊलीच्या पायी एक-दोन क्षण जरी रंगुन गेलो तरी जीव सुखरूप होऊन जातो...
अप्रतिम लेख !!

खूप सुंदर उतरलाय लेख, शशांक...
तू - एक कृष्णलाघव ....किती छान शब्दं

मग ह्यावर्षी वारीला का?

किती सुरेख लिहिलंय! खूप आवडलं!
नुक्तीच आळंदीपासून पुण्यापर्यंत वारीबरोबर चालत यायची सुसंधी मिळाली आणि अगदी हे सगळं असंच्या असं अनुभवायला मिळालं... त्यामुळे शब्द न् शब्द पोहोचला! Happy

अवघे गर्जे पंढरपूर | चालला नामाचा गजर ....

पंढरीनाथ महाराज की जय ......
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम ....

लेख खुप खुप म्हणजे खुपच आवडला.

पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.

पंढरीनाथ महाराज की जय ......
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम ....

अहाहा ! आषाढी एकादशी सार्थकी लावलीत....
निव्वळ सुंदर......

तू - नि:स्वार्थी प्रेमाचं नवनीत लुटवणारा
तू- सर्व विश्व व्यापुन दशांगुळे उरलेला
तूच रे सावळ्या....

Pages