जय जय जयकारे नाम येता मुखासी
अविरत सुखवृष्टी अंतरी हो तयासी
सदयह्रदय माझी माऊली ज्ञानदेवी
कवळ तरी सुखाचे बाळका नित्य फावी
मुखि जरि नित ओवी येत की ज्ञानदेवी
अगणित सुखराशी लाभते भाविकासी
पठण मनन भावे त्यावरी ध्यास घेई
जननि अतिव प्रेमे मोक्ष भक्तीस देई
अपरमित गुणासी वर्णिता वर्णवेना
जननि तव कृपेला मोजिता मोजवेना
चरणि तरि असावे बालका दान देई
गुणगुणत स्वभावे अंतरी एक ओवी
श्री ज्ञानेश्वरमहाराजांचरणी प्रेमपूर्वक दंडवत.
कवळ..... घास, ग्रास
फावणे.... प्राप्त होणे
ज्ञानदेव थोर
ज्ञानदेव थोर । योगीयांचा राणा ।
भावे देवराणा । मूर्त केला ।।
ज्ञानदेवीतूनी । करिसी उघड ।
ब्रह्मविद्या गूढ । सकळिका ।।
वर्णियेला हरी । निर्गुण अनंत ।
जरी शब्दातीत । सांगे श्रुती ।।
शब्द अमृताचे । ठेवोनिया फुडे ।
ब्रह्मचि रोकडे । रुप केले ।।
भाषा मराठीची । गुढी उभविली ।
गगनीही भली । सामावेना ।।
यथार्थ गौरव । माऊली नामाने ।
भाविक प्रेमाने । हाकारिती ।।
जन्मोजन्मी ठाव । देई चरणांशी ।
तेचि सुखराशी । शशांकासी ।।
धन्य माय ज्ञानदेवी
नित्य चैतन्य वहाते
ज्ञानदेवी ओवीतूनी
नाद कैवल्याचा गोड
घुमे शब्दाशब्दातूनी
फुले मोगरीचा मळा
ज्ञानदेवी ओवीतूनी
परिमळ प्रतिभेचा
आसमंत सुखावूनी
समईची शांत ज्योत
तेवतसे ओवीतूनी
फिटे अंधार जुनाट
मन प्रकाशी न्हाऊनी
ज्ञानदेवी ओवीओवी
अमृताच्या धारावाणी
लाभे तापल्या जीवाला
अवचित संजीवनी
ज्ञानदेवी माय माझी
कशी कृपावंत भली
तिच्या कुशीत रिघता
तृप्तताही विसावली....
कार्तिक वद्य त्रयोदशी, माऊली संजीवन समाधी सोहळा
माऊलीचरणकमली समर्पित...
ज्ञानदेवी साच । माऊलीच मूर्त । देतसे अमृत । साधकासी ।।
शांत मनोहर । देखणे नितळ । कोवळी विमळ । शब्द रत्ने ।।
निववी साधका । शब्दचि कौतुके । भाव अलौकिके । ठसविती ।।
ओवी ओवीतून । ज्ञान योग कर्म । दावितसे वर्म । ज्ञानदेवी ।।
सद्गुरुंच्या मुखे । अाकळे यथार्थ । मुख्य तो भावार्थ । ठाई पडे ।।
एकचित्त भावे । पठण मनन । ह्रदयी स्मरण । नित्य होता ।।
देतसे अाशिष । माऊली विशेष । साधका निःशेष । सप्रेमाने ।।
समाधान मुख्य । भक्तिभाव खूण । माऊली संपूर्ण । कृपा करी ।।