चांदोमामा , चंदाराणी की चंदा डार्लिंग....
खरं सांग कोण आहेस तु?
निंबोणीच्या झाडामागे खरच लपतोस का तु?
कधी असतोस मामा तर कधी असतेस राणी
खरच का तुझ्यासोबत नाचते समुद्राचे पाणी?
लहानपणी आमच्या ताटात असायचा
तुझ्या नावाचा एक घास
चांदोमामाच्या गावाला जायचा
एकच होता आमचा ध्यास
दर महिन्याला तू
जातोस तरी कुठे?
कुठल्या "ताऱ्यासाठी"
तुझा जीव तीळ-तीळ तुटे?
अजूनही आठवतो का रे तुला
आपला पाठशिवणीचा डाव
वेगळाच होता ना
तो तुझा माझा गाव
शेवटी थकून झोपायचो
मी आईच्या मांडीवर
तू मात्र तसाच जागा
निंबोणीच्या फांदीवर