निरोप
*निरोप*
केलीस फार तू निरोप घेण्या घाई
मन:पटलावरचे पुसलेसुद्धा नाही
ही आठवणींची गलबललेली चित्रे
सोडू का माझ्यासोबत कुण्या प्रवाही
चेहरा असा पारा पुसलेला ऐना
ना बिंब कोणते वा काही उमटेना
भवताली रंगबिरंगी सजते दुनिया
अन् मला सफेदीमध्ये या करमेना
काळासोबत गळतील मनाची पाने
ना पुन्हा बहरणे कुठल्या हिरवाईने
देहास फरपटत नेऊ पैलतीराला
की गाऊ माझे गाणे आनंदाने
मी जरा मोकळे बोलू जाता येथे
शब्दांचे धागे दुनिया ओढत नेते
अवघ्या प्रश्नांचा गुंता गुंता होतो
उत्तर पहिले काळीज काढुनी घेते