भरपूर उजेड आहे इथे.
इतका उजेड मला झेपेल का?
इतका उजेड मला पुरेल का?
हा उजेड माझा व्हायला हवा.
करू अशी आशा?
आहे मला परवानगी?
की नकोच?
जराशी तिरीप आणि
कुणीतरी तारस्वरात भुंकू लागतो.
कुणी हिडीस नाचत ती तिरीप कापून टाकतो
बरेचसे चोची मारतात
तरीही उजेड हवाय मला.
माझा माझा.
तळघराचा तळ गाठून झाला असावा.
आता बाहेर यायचंय.
हवा, पाणी, उजेड सगळ्यांचाच असतो.
माझा वाटा हवाय.
- नी
(लिखाणातून)
नाहीच कळलं....
तुझ्या असण्यातून,
नसण्यातून,
वागण्यातून,
बोलण्यातून,
हसण्यातून,
चिडण्यातून,
उगाचच कशावरही रुसण्यातून,
नाहीच कळलं...
तुझ्या अर्थावरून,
निरर्थावरून ,
समजावण्यावरून,
समज देण्यावरून,
नाहीच कळलं...
तुझ्या
अवेळी येण्यावरून,
न सांगता जाण्यावरून,
मनासारखं होईपर्यंत केलेल्या हट्टावरून,
मनाविरुद्ध झालेलंही स्वीकारण्यावरून,
नाहीच कळलं..
आपण यांना वाचलंत का अर्थात मायबोलीवरच्या मला आवडलेल्या कविता
कविता हा आपल्या मायबोलीत/वरच नव्हे तर आख्ख्या जगात सगळ्यात जास्त प्रमाणावर लिहिला जाणारा साहित्य प्रकार असावा.
आजच्या घडीला मायबोलीबाहेरही प्रथितयश ठरलेल्या अनेक रचनाकारांनी, आपल्या कारकीर्दी च्या सुरुवातीच्या काळात व नंतरही अनेक रचना मायबोलीच्या व्यासपीठावरून प्रसिद्ध केल्या आहेत. कित्येक अप्रसिद्ध किंवा हौशी रचनाकारही अनेकदा असे काही लिहून जातात की लगेच तोंडून वाहवा निघावी.
*कविता*
भावनांचा बाण जेव्हा,
हृदय छेदून जातो.
रक्तरंजित जखमेतून तेव्हा
कवितेचा हुंकार येतो.
शब्दकळ्यांना झुळूक जेव्हा,
भावनांची फुंकर घालते.
कळत नकळत तेव्हा
कवितेचे फूल फुलते.
स्वयंभू अन सर्वव्यापी
फुलपाखरी मधुगंध कुपी
दु:खी, मुकी, छंदी फंदी
कविता असते ब्रम्हानंदी
कविता कधी माझी नसते
कविता कधी तुमची नसते.
हृदयाला भिडणारी,
कविता फक्त कविता असते.
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी
नको चढ, नको उतार
उंच नको जायला फार
घ्यायचीय कुणा भरारी
आपण बरे, कामे बरी
शांतपणे सरून जावी, गात मस्त गाणी
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी
मला नाही जिंकायचे जग
कशासाठी धावायचे मग
जाऊ पायवाटेने निवांत
नको उद्याची रे भ्रांत
‘वेग’ नको, ‘वेग’ हवा, बाकी नाही काही मागणी
साधी, सरळ, सोप्पी हवी, जीवनाची कहाणी
ओथंबलेले क्षण का स्मरतात
स्मृती उगाचच गर्दी करतात
जुन्या आठवणी कुरतडतात
हळुवार क्षणी मात्र डोकावतात
आठवणी आल्या चोर पावलांनी
हृदयाचा ठोका चुकला क्षणांनी
दगा दिला डोळ्यातील आसवांनी
दूर तरी बांधलो प्रेमाच्या नात्यांनी
हाक दिली हृदयस्थ भावनांना
प्रतिसाद नाही आला शब्दांना
विझावतो आतल्या तीव्र उद्रेकांना
साद घालतो आपल्याच लोकांना
शून्य असे मी ओढुनताणुन
नुसता पोकळ रिक्ताकार
पोकळीत कण भरण्यासाठी
कुरतडतो अंतरी विचार
रिक्त भासते परी तिथे मग
राजस तामस तगमग नूतन
कशास पुनरपि रेटा द्यावा
नव्या दमाने प्राणच ओतुन?
शून्य म्हणुनी का व्यर्थ जगावे
का शून्यातच विरूनि जावे
शून्यभावनें राख कुडीची
व्योमाकाशी विखरत जावे?
पण..
क्षुद्र तृणावर सावरलेला
दवबिंदू जणु प्रकाशयात्री
अस्तित्वाचे अगम्य उत्तर
नित्य वसतसे त्याच्या गात्री
शांत स्वरांची सात्विक वृत्ती
कधी ऐकतो अंधारातील
कधी झोंबतो पहाटवारा
शाल तोकडी घेता वत्सल
मनी कुणाच्या बीज रुजवितो
बीजातुन कधी स्वये उगवतो
खडकाची मुळी तमा न धरता
मातीतुनी पालवी घडवितो
वनवासी सोयरे नसो, पण
रत विश्वाचे भान असे मज
थेंब टपोरे सरसर येता
होऊन कोळी जाळे विणतो
नदी वाहता निर्मळ झुळझुळ
मान-पाठ करुनिया धनुकली
पलाशपानी द्रोण घेऊनी
प्रवाहातले कृमी तारतो
वृक्षांच्या अंतरिचे रूदन
बनुनी पिंगळा स्तब्धसाक्षीने
अपुल्या हृदयी अर्कवून मग
भोवताली कर्कशा घुमवितो
पूर्वीची मी साधा विनोद ऐकला तरी फिदीफिदी हसत असे
उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे खळाळून वाहत असे ।
आता अख्खी विनोदी गोष्ट वाचली तरी हसू येत नाही
कुणी खिंकाळून हसलं तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी भुक्कड अशी खादाडी करत हिंडत असे
बिनधास्तपणे रस्त्यावर भैयाकडची पाणीपुरी हाणत असे ।
आताशा चटपटीत चाट हायजिनिक वाटत नाही
कुणी खात असेल तर आवडतही नाही ।।
पूर्वीची मी कुठलाही विषय घेऊन अखंड बडबड करत असे
अनंतकाळ वाहणाऱ्या वाऱ्याप्रमाणे वाचा यज्ञ करत असे ।
आता चुकूनही जास्त बोलायला आवडत नाही
कुणी बडबडत असेल तर आवडतही नाही ।।