सुस्नात तू गं ओलेती...

Submitted by अ'निरु'द्ध on 2 July, 2019 - 11:02

सुस्नात तू ओलेती

सुस्नाऽत तू गं ओलेऽती
केसऽही तुझे ते ओले...
अन् थेंब उष्ण तव गाली
परि मन माझे ते भिजले...

अंगावर ओले वसन
बिलगे तनुला तव ओल्या...
कासाविस करुनी सोडी
माझ्याच मनाला खुळ्या...

तनु पुसतानाचा बांक
अन हलके हलके झोके...
मृदू वस्त्र टिपे तव काया
मन माझे परि ओथंऽबे...

हलकेच बांधिशी केस
उचलुनी दुमडुनी कर...
पाहूऽनी अदा जिवघेणीऽ
माझाच धडधडेऽ ऊर...

आरऽसा बिलोरी दावे
तव पुष्ट सघन प्रतिबिंब...
तो लोभस नाजूक बांधा
पाहुऽनी होई मन चिंब...

हळूवार टिपशी वस्त्राने
अलवार थेंब वक्षीचे...
पाहुनी किलकिल्या डोळा
विसरी मी सोंग निद्रेचे...

तू टिपता माझी नजर
त्या किंचित उघड्या वक्षी...
तव नयन झुकावे खाली
नख रेखे भुईवर नक्षी...

अप्सरा भासशी देही
चेहऽरा निराऽगस भोळा…
आसुसूऽन जवळी घेऊ
की मुका घेऊ तव भाळा…

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ Filmy पहिल्या प्रतिसादाबद्दल आभार....

दत्तात्रेय साळुंके, शाली, मानव पृथ्वीकर .....
प्रतिसादाबद्दल आभार..

"सुस्नात" म्हणजे व्यवस्थित आंघोळ केलेला/ली..

इथे अभिप्रेत - छान न्हायलेली.. (छान न्हाऊन नुकतीच बाहेर आलेली)

आयची आन ,

रामबाण बोल्ले तो शोल्लीड रामबाण ...

प्रणय ओथंबून भरलाय ,

जसा पाऊस त्या काळ्याभोर ढगात लपलाय ...

खुलवलाय मळा अलवार निळाईचा ,,,

मुका राहू द्या ओ बाजूला

उडवून द्या बार पेनातल्या शाईचा

अरे वा !!
फुल्ल टू रोमँटिक !
ग्रेट.. Happy

प्रतिसादकांना धन्यवाद...

@ आशुचँप : काव्यनायक रसिक आहे ते कळतंच आहे.
तो बोलेल काय आणि रसिकपणे प्रत्यक्षात करेल काय... त्याच त्यालाच माहिती..
माझ्यामते तो कोणाचीच आणि विशेषतः स्वतःची निराशा न करावा.. Wink

झकास कविता...

पाटणकर, शिका इकडून!

छान आहे. मला बाकी कवितेपेक्षा शेवटच्या चार ओळींमधल्या द्विधा मनस्थितीचे वर्णन जास्त आवडले.

इतके करून कवी भाळाचाच मुका घेणार होय >>> आशूचॅम्प, या चार ओळींमधे दोन वेगळ्या प्रतिमा दिसत आहेत. अप्सराही भासत आहे, आणि चेहरा निरागस भोळाही. त्यामुळे प्रतिक्रिया नक्की कशी द्यावी याचा संभ्रम बाकी दोन ओळींत आला आहे. मलाही पहिल्यांदा वाचली तेव्हा हाच प्रश्न पडला होता पण पुन्हा वाचल्यावर जास्त चांगली समजली.

असाच विरोधाभास गदिमांनी कुश लव रामायण गाती या गीतामधे "राजस मुद्रा, वेष मुनींचे" या चार शब्दांत चपखल उभा केला आहे. लव आणि कुश बालपणापासून वनात वाल्मिकी मुनींकडे वाढले त्यामुळे रामासमोर गातात तेव्हा वेष मुनींचे आहेत. पण मूळ व्यक्तिमत्त्व क्षत्रिय, राजकुमारांचे आहे. या कवितेचा विषय पूर्ण वेगळा असूनही त्या शेवटच्या ओळींमुळे याची आठवण झाली.

नाही सस्मित, माझ्या मनात नवपरिणीत आणि दोघेही तरुण असलेलंच जोडपं होतं... Happy

अजिंक्यराव, धन्यवाद...

फारएण्ड, खूप छान प्रतिसाद...
प्रणयभावना कधी आसक्तीची असते, कधी लाघवी..
कधी नर्मशृंगाराची तर कधी बेभान शृंगाराची...

बस्स... हिच द्विधा मनःस्थिती झालेली दाखवायची होती..

आणि मुख्य म्हणजे हे नातं चोरटं नाही...
अधिकृत आहे, हक्काचं आहे, शाश्वत आहे...
वेगवेगळ्या प्रणयभावनांचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे आविष्कार त्याला/त्यांना सहज शक्य आहेत...
त्यामुळे.....