* दुभंग *
किलकिले करोनी I जरा बंद दार
प्रवेशलो पार I मुळापाशी II
तिथे उजवेना I आसक्तीची कूस
माती भुसभुस I लाख होती II
कोमेजून कोंभ I पहुडला संथ
वाटेनाच खंत I त्याची त्याला II
ओलाव्याचा सोस I मनाला उभारी
गोठलेली सारी I इच्छाकांक्षा II
घेववेना तिन्ही I ऋतुशी धडका
जन्माचा भडका I थंडावला II
पाने फुले फळे I कुठले बहर
स्वप्नात प्रहर I टक्क जागे II
तळे शेवाळले I साकळे अंधार
वेदना गर्भार I मुळापाशी II
***
तुझ्या आठवांचं संचित
'आपल्या' असणाऱ्या सगळ्या क्षणांच्या
मऊशार अशा रेशमी रुमालात गुंडाळून
माझ्या मनाच्या
खोल, अंधाऱ्या तळघरात
जपून ठेवलंय मी
युगानुयुगं
शरीर जीर्ण झालं असलं
तरी त्या क्षणांवर एक
सुरकुती हि नाही
का त्या आठवांवर
कुठलेही तरंग उठलेले नाहीत
अंतरीची भळभळती जखम
सातत्याने वाहतेय
नव्यानं तयार होणारं रक्त
त्या तळघराच्या जमिनीला
अखंड ओलावा देतंय
हृदयाच्या भिंतींना
अजून हि चिरा गेलेल्या नाहीत
पण त्यावर काही युगांची पुटं मात्र
आता चढू लागलीयत
अश्रु..
तुझ्या डोळ्यांतील
अश्रु पाहुन
आई!..जीव माझा
कासावीस झाला
नेमका काय असेल
अर्थ तयाचा
तो आज उमगला
माझ्या प्रत्येक
वाटचालीसाठीची
तुझी होणारी
तगमग
आज मज जाणवली
अशा अजुन किती
वेदनांची अश्रुफुले
तु माझ्यासाठी सांडवली
तुझ्या नयनांतील
हे अश्रु
नसतील आता
वेदनेचे
ते अश्रु
असतील आता
आनंददायी क्षणांचे
तो टिपुन घेता तु
अलगद तुझ्या करांने
सफल होईल माझे
अवघे जीवन
तुझ्या पोटी
जन्मल्याचे!..
(दिप्ती भगत)
वेदना ( शेतकरी मोर्चा )
मुकी वेदना ही माझी
उरातच दबलेली
प्राण कंठाशी हा येता
टाहो फोडत बोलली
नशिबीचे काटेकुटे
फुलं मानून वेचले
कष्टकरी या हाताने
घास तुम्हा भरविले
आता भेगाळला जीव
सारे आभाळ फाटले
मातीतल्या माणसाने
माणसाला हाकारले
दैव दैव कसे असे
देव भिकारी हो झाला
रानोमाळ गोट्यातून
लाल पूर प्रगटला
आता सबूरी असावी
उखडील संरजामी
दिशा दिशा पेटविल
ठिण्गी फुले अंतर्यामी
© दत्तात्रय साळुंके
तुझ्या निद्रिस्त चेहऱ्याकडे बघताना
नकळत साकळतात डोळ्यांआड अश्रू
सवयीनं वेदनेची धार बोथट होतेच असं नाही
ऐकण्या पुरतेच त्याला चाहते,
दुःख माझे मूक होऊ पाहते.
काळजामध्ये कट्यारी खोवल्या,
भावना रक्तात माझी नाहते.
गर्भ माझा वेदनांनी अंकुरे,
आसवांचे मूल डोळी वाहते.
दु:ख आहे पोरके माझ्यापरी,
प्राण माझा होऊनी ते राहते.
द्रौपदीचा वारसा माझ्याकडे,
पंचप्राणांच्या चुकांना साहते.
------------------------------------
सारंग भणगे (ऑक्टोबर २०१३)
दु:ख, वेदना यांचा अनुभव केवळ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमूळेच येत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा Loss आणि त्यामूळे होणारा त्रास किंवा दु:ख आपल्याला होत असते. मात्र त्याकडे Loss असं म्हणून बघितले जात नाही. मनाला उदास वाटणे, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, मनाला न करमणे, चिडचिड यासारखी भावनिक आंदोलने किंवा स्थिती आपण अनुभवतो पण त्याखाली आपल्यासाठी महत्वाची असणारी कुठली तरी गोष्ट आपण गमावलेली असू शकते.
अशा कोणकोणत्या गोष्टी असतात? ज्याने आपल्याला वरील प्रकारच्या भावनांना सामोरे जावे लागते?
आज माझ्या वेदनेला
पंख हसरे लाभले
दु:ख झाले पाखरू
अन नाचु गाऊ लागले
भिरभिरीची पाखराच्या
सवय होऊ लागली
वेदनेच्या जाणिवेची
गरज भासू लागली
दूर झाले मग सुखाच्या
पाश सारे तोडले
जीव जडला वेदनेवर
दु:ख मिरवू लागले.
भेटते जेव्हा नव्याने
वेदनेला त्या जुन्या
जाग येते जीवनाच्या
मैफिलीला मग सुन्या
जयश्री
३१.१०.२०१२
जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती.
------------------------------------------------
आज.. उद्या... कधीतरी..
या तालातच आतलं काहीतरी फिरतंय.
खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे.
स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं,
तसं ते बाहेर येणार.
वाट बघणं चालू आहे.
स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते,
गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो,
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.
मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का?
एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे?
हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच..
माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते