वेदना ( शेतकरी मोर्चा )
Submitted by दत्तात्रय साळुंके on 13 March, 2018 - 05:04
वेदना ( शेतकरी मोर्चा )
मुकी वेदना ही माझी
उरातच दबलेली
प्राण कंठाशी हा येता
टाहो फोडत बोलली
नशिबीचे काटेकुटे
फुलं मानून वेचले
कष्टकरी या हाताने
घास तुम्हा भरविले
आता भेगाळला जीव
सारे आभाळ फाटले
मातीतल्या माणसाने
माणसाला हाकारले
दैव दैव कसे असे
देव भिकारी हो झाला
रानोमाळ गोट्यातून
लाल पूर प्रगटला
आता सबूरी असावी
उखडील संरजामी
दिशा दिशा पेटविल
ठिण्गी फुले अंतर्यामी
© दत्तात्रय साळुंके
विषय: