मर्यादित

आज.. उद्या... कधीतरी...

Submitted by नीधप on 2 May, 2011 - 00:59

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती.
------------------------------------------------
आज.. उद्या... कधीतरी..
या तालातच आतलं काहीतरी फिरतंय.
खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे.
स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं,
तसं ते बाहेर येणार.
वाट बघणं चालू आहे.
स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते,
गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो,
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.

मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का?
एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे?

हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच..
माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते

गुलमोहर: 

संवादायचंय!

Submitted by नीधप on 26 April, 2011 - 00:36

संवादायचंय खूप सारं..
मला असं होतं
तुमचं काय?
मी अशी, मी तशी
तुमचं काय?

अचानक घसा कोंडतो तेव्हा
नाकात होणारी झर्रझुणझुण,
अकारण अवेळी आगंतुकशी
कणाकणातून खेळणारी वीज,
ओढणीच्या चुण्याचुण्यांतून
मनभर पसरणारी मखमल,
सगळं असणं भरारी मारताना
थिजून दगडलेले पाय,

असं खूप सारं
खूप आतलं
खूप आपलं
सवांदायचंय अमर्याद

आणि मखरात नटून बसलाय
माझा मर्यादित शब्दकोश...

- नी

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मर्यादित