याज्ञसेनी
ज्ञात आहे याज्ञसेनी? दुर्जनांची ती सभा?
दास होत्या सोंगट्याही, ना कुठे न्याया मुभा!
फास बनला द्यूत जेव्हा आणि फासे नाचले,
संपला पुरुषार्थ तेव्हा हात वस्त्रा लागले
ज्येष्ठ ते अन् श्रेष्ठ जे, हे धर्म पंथी मूक का?
भीष्म येथे, द्रोण येथे,का तरी शोकांतिका?
अंध म्हणूनी काय झाले ? ऐक राजा ही व्यथा
वर्ज कर या मूढ लोका, रोख काळाच्या रथा!
कोरड्या चेहऱ्यावरी ना रेष, ना संतप्तता,
कौरवांच्या या कृतीला सहमती जणू दावता?
काय झाले धर्मराजा? काय झाले अर्जुना?
आठवा तुमच्या हितार्थ साहिली मी वल्गना!