चातक

कृष्णार्पण

Submitted by पुरंदरे शशांक on 13 December, 2024 - 21:12

कृष्णार्पण

गरगर फिरवी ऐहिक पाही
मला तुझा आधार हवा रे
असो नसो वा पुण्य गाठीशी
मोरपीसही फिरवून जा रे

व्याकुळ ह्रदयी बरसत जा रे
थेंब सावळा एक पुरे रे
मेघ कृपेचा तूच आसरा
चातक आर्ती पुरवी अता रे

नसे पात्रता ज्ञान योग हो
यम दम सारे अवघड की रे
हाक मारता रुद्ध कंठ तो
कसे बोलवू जाणत ना रे

अशीच राधा व्याकुळ होता
तन्मय पाही ह्रदी तुला रे
हाच दिलासा मला एकला
संशय ते ही फिटले सारे

नुरो देह हा नुरो जाणिवा
बंधन काही नको नको रे
आर्त एकचि हृदी रहावी
कृष्णार्पण ते सारे सारे

चंद्राचे चांदणे

Submitted by Sushant Chougule on 7 June, 2013 - 12:53

जिचे हास्य जणू चंद्राचे चांदणे,
पण पलटे कलाकलांनी,
तिला कसे कळावे,
किती होरपळून मेले,
दिवसा सूर्याच्या झळांनी !

जिचे आगमन जणू वळवाचा पाऊस,
पण बरसे आपल्याच लहरीत,
तिला कसे कळावे,
किती चातक आतुर,
पाण्याच्या पहिल्या थेंबास !

जिचे शब्द जणू अमृताचा प्याला,
पण सोबत असे विषकुंड,
तिला कसे कळावे,
किती नीळ्कंठ होऊन गेले,
प्राशाया अमृताचा एक थेंब !

............ न्याय तुमचा खास आहे

Submitted by डॉ अशोक on 12 April, 2011 - 05:08

............ न्याय तुमचा खास आहे

तक्रार तुमची, पोलीस तुम्ही, न्याय तुमचा खास आहे
सीता असो वा द्रौपदी, नशिबात अमुच्या वनवास आहे.

आले किती, गेले किती, यात सारे गर्क झाले
बागेतल्या फुलांनाही, येथे गणिताचा तास आहे.

कोण वेडा, कोण नाही, वेडेच ठरविती सर्व काही
लाट आहे बारकी पण, मज सुनामीचा भास आहे.

भाट यांचे गाऊन गेले, ढोल यांचे बडवून झाले
बंद करतो कान माझा, इतुकाच मजला त्रास आहे.

पेरले मी, राखले मी. चातकासम थांबलो मी
काही म्हणा भगवन परि, मज फळाची आस आहे

-अशोक

गुलमोहर: 
Subscribe to RSS - चातक