महामानिनी द्रौपदी

Submitted by अमर ९९ on 21 August, 2019 - 04:53

द्रौपदी व सीता ह्या दोन व्यक्तिमत्वांच्या रूपाने व्यास व वाल्मिकी या दोन दिव्य प्रतिभावंत कवींनी स्त्रीचे आदर्श निर्माण केले. (चुकलोच की, असे म्हणू "त्यांना त्या काळात वाटले असे " ) दोघींवर प्रचंड संकटे कोसळली तरी धैर्याने त्यांना तोंड देऊन दोघींनी आपली पतीवरील निष्ठा शेवटपर्यंत कायम राखली. या बलिदानाची छाया हजारो वर्षे भारतातील सर्व स्त्रीयांवर पडली आहे. दोघींचेही जीवन अत्यंत दु:खात गेले आहे, पण सीता व द्रौपदी यांच्यात एक फरक आहे. सीतेची दु:खे श्रीरामाच्या कर्तव्यनिष्ठेतून निर्माण झाली व सीतेला त्याची पुरेपूर जाणिव होती. श्रीराम आपल्याइतकाच हतबल आहे, दु:खी आहे हे माहित असल्याने ती श्रीरामाला कधीही दोष देत नाही. द्रौपदीची संकटे तिच्या पतीच्या चुकीच्या धर्मकल्पनेमुळे निर्माण झाली व हे ठाम माहित असल्याने ती पतीला दोष देते. त्यांच्याशी वादविवाद करते. जरूर तेव्हा त्यांच्या भावनेला हाक मारते.

या दोघींचे गुण इतके सर्वश्रेष्ठ आहेत की दोनही महाकवींच्या प्रतिभेला त्यांना मानवी जन्म देणे योग्य वाटले नाही. दोघीही अयोनिज आहेत. सीतेचा जन्म भूमीतून झाला व तिने आपल्या आईकडून क्षमा, वात्सल्यता, सहनशीलता असे गुण उचलेले. ती कोणावरही रागावत नाही. द्रौपदीचा जन्म यज्ञकुंडातून झाला. ज्वालेकडून तिने धगधगित क्रोध उचलला. ती महामानिनी आपली अवहेलना १३ वर्षे विसरली नाही. कृष्ण कौरवावांव्या दरबारात जायला निघाल्यावर तिने त्याला स्पष्ट सांगितले ," माझा अपमान माझे पती विसरले असतील व त्यांना आपल्या पत्नीच्या अब्रूची चाड नसेल ; तरी माझ्या पुत्रांना आपल्या मातेची अब्रू रक्षणीय खास वाटेल. माझे पाच पुत्र अभिमन्युला पुढे करून कौरवांशी लढतील. " लक्षात घ्या, आपल्या पाच मुलांपेक्षा आपला सावत्र मुलगा युद्धशास्त्रात जास्त निपुण आहे हे तिला चांगले माहीत आहे व तो आपल्या करिता प्राणपणाने लढेल हेही ती जाणून आहे. ती पुढे कृष्णाला भरीस घालते," अभिमन्युसारखे ते पाच तुझेच भाचे आहेत." कृष्णाला तिला आश्वासन द्यावे लागले की " शत्रूंचा विनाश होऊन पती वैभवास चढलेले तू पहाशील ".

उत्पत्ती
द्रोणांनी द्रुपदाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य घेतले हा अपमान द्रुपद विसरला नाही.द्रोणांचा वध करणारा पुत्र मिळवण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्या वेदीतून धृष्टद्युम्न बाहेर पडला व त्यामागून द्रुपदाने न मागतलेली आणि त्याला कल्पनाही नसलेली कुमारी, द्रौपदी, उत्पन्न झाली. तिच्या अंगप्रत्यंगातून सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार होत असून ती अत्यंत लावण्यसंपन्न होती. सावळ्या रंगाची, निळ्या कमलाप्रमाणे विशाल नयन, लांबसडक काळेभोर केस,धनुष्याकृति भिवया, यामुळे इहलोकी आलेली साक्षात देवताच वाटत होती. ती इतकी सुंदर होती की अर्जुनाने पण जिंकला होता तरी सर्व भावांना ती पत्नी म्हणून पाहिजे होती. मग तिला पाचही भावंडांशी लग्न करावे लागले व तसे केले नाही तर आपणास अर्जुन मिळणार नाही जे जाणून तिने परिस्थितीचा स्विकार केला.
महाभारतातील तीनही सौंदर्ययुक्त व्यक्ती कृष्ण, द्रौपदी व अर्जुन रंगाने सावळ्याच आहेत.

शिक्षण
महाभारतकाळी स्त्रीया शिकण्यासाठी गुरूगृही जात नसत. त्यांचे शिक्षंण घरीच घरातले वृद्ध, मुद्दाम योजलेले गुरू यांच्याकडून होत असे. द्रुपदाने मुलीला उत्तम शिक्षण दिले होते. महाभारतकार तिला "पंडिता " म्हणतात. युधिष्टराशी ती वाद घालत असते तेव्हा याची खात्री पटते. (येथे उतारे देत नाही.)

स्वयंवर

द्रुपदाची इच्छा द्रौपदी अर्जुनाला द्यावी अशी होती. पण पांडव जळून मेले अशी बातमी आली म्हणून त्याने असा पण लावला की असला तर अर्जुन किंवा निदान त्याच्या समान योद्धाच तो पण जिंकेल. स्वयंवराच्यावेळी धृष्टद्युम्नाने घॊषणा केली की " हे धनुष्य, हे बाण. यांनी लक्ष्यवेध करावयाचा आहे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य असा कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याचीच भार्या माझी ही भगिनी कृष्णा होईल." अटी स्वच्छ शब्दात सांगितल्या आहेत. कर्णाने धनुष्याला हात घातल्यावर द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की " काय वाटेल ते झाले तरी मी सूताला वरणार नाही." यात कर्णाचा अपमान झाला हे खरे पण ती त्याने आपल्यावर ओढून घेतलेली आपत्ती होती.

द्युतप्रसंग

या प्रसंगी द्रौपदी प्रथम वकिली डावपेच खेळली. तिने भीष्म-द्रोणांना साक्षीला बोलाविले. चांडाळचौकडीपुढे त्याचा काही उपयोग झाला नाही व शेवटी गांधारीच्या सांगण्यावरूनच तिची सुटका झाली. धतराष्ट्राने तिला वर मागावयास सांगितल्यावर तिने युधिष्ठिराला दासमुक्त करण्यास सांगितले. ती म्हणते " माझा मुलगा अतिविंध्य याला लोकांनी दासपुत्र म्हणू नये. मोठमोठ्या राजांनी सम्राटाचा पुत्र म्हणून त्याचे कौतुक केले, त्याला दासपुत्र असे विशेषण कोणी लावावयाला नको ". धृतराष्ट्र तिला दुसरा वर माग म्हणाल्यावर तिने शस्त्रास्त्रांसहित भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तो तिसरा वर माग म्हणाल्यावर तिने त्याला नकार दिला. " लोभ धर्माचा नाश करतो. दुर्गतीतून पार पडून स्वतंत्र झालेले माझे पति स्वत:च्या भरवशावर गेलेले वैभव परत मिळवतील. " आता तिला वर मागून मिळवलेले राज्य नको आहे. स्वत:च्या पतींनी पराक्रम करून, कौरवांना धूळीत मिळवून मिळवलेले राज्य हवे आहे.

वनवास

वनवासात तिच्यावर संकटे कोसळली, दुर्वासांकडून सत्वपरिक्षेचा प्रसंग ओढवला. जयद्रथाने पळवून नेले व इच्छा असूनही त्याला देहदंड देता आला नाही. प्रिय पती अर्जुन याला युद्धाच्या वेळी उपयोगी पडणारी अस्त्रे देवांकडून मिळवण्यासाठी दूर जाण्याची गरज निर्माण झाली म्हणून निरोप द्यावा लागला. परंतु वनवासात एक असा प्रसंग घडला की व्यासांनी त्यात तिच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा एक दैदिप्यमान पैलू दाखवून दिला.
पांडवांना भेटावयाला श्रीकृष्ण सत्यभामेसह वनात आला. तेव्हा एकांतात असतांना भामेने द्रौपदीला विचारले की " हे द्रौपदी, लोकपालासारखे पराक्रमी, एकमेकावर प्रेम करणारे पांडव तू स्वाधिन करून घेतले आहेस, ते तुझ्यावर कधीही कृद्ध होत नाहीत, प्रत्येक महत्वाच्या गोष्टीत तुझ्याकडून मार्गदर्शन होईल अशा अपेक्षेने तुझ्याकडे पाहतात, इतके वर्चस्व त्यांच्यावर गाजवण्यासाठी तू कोणते व्रत, मंत्र, विद्या, औषध, अंजन इ,चा उपयोग करतेस ते मला सांग. म्हणजे मी ही कृष्णावर त्याचा उपयोग करून त्याला कायमचे माझे स्वाधीन करून घेईन." द्रौपदीने दिलेले उत्तर व्यासांनी ६०-७० श्लोकात दिले आहे. आपण त्यातले काही पाहू.
" हे सत्यभामे, दुर्वृत्त व भ्रष्ट स्त्रीयांचा मार्ग तू विचारलास, मी त्याचे काय उत्तर देऊं? श्रीकृष्णाची प्रिय महाराणी होण्याचे भाग्य लाभलेल्या स्त्रीच्या तोंडी असा प्रश्न वा संशय शोभत नाही. मंत्र वा औषध यांच्या सहाय्याने स्त्री आपल्याला स्वाधीन ठेवते असे पतीला कळले तर तिचे दर्शनही त्याला त्रासदायक वाटेल. अन्नातून भलत्याभलत्या गोष्टींची प्रयोग करून जलोदर, कुक्षीव्याधी,श्वेतकुष्ठ, जडत्व, अंधत्व बधिरपणा, नपुंसकत्व असे भीषण रोग पतीला जडतात. असे आचरण पत्नीने कधीही करू नये.
पतीला स्वाधीन करून घ्यावयाचा खरा मार्ग आपल्या पतीला आवडणार नाही असे आचरण पत्नीने कधीही न करणे हाच आहे. बसणे, जाणे,हावभाव वा अंत:करणचे निश्चय यापैकी कोणत्याही बाबतीत यत्किंचित देखील त्यांच्या मनाला लागण्यासारखे काहीही घडू नये यासाठी मी सदैव जपत असते. माझ्या पतींचे भोजन झाल्याखेरिज,त्यांनी विश्रांति घेतल्याविना मी कधीही भोजन व विश्रांतीची अपेक्षाही करत नाही. माझे पति कोठूनही आले तरी दासदासींऐवजी मीच उठून त्यांना आसन व उदक देऊन, मी त्यांचे अंत:करणपूर्वक स्वागत करते.घर व उपकरणे सदैव स्वच्छ राहतील,वेळेवर उत्कृष्ट अन्नाचे भोजन त्यांना मिळेल याची मी स्वत: काळजी घेते.खूप हसणे, खूप रागावणे हे मी चुकुनही कधी करत नाही. माझे पति खानापानात जी गोष्ट आणू इच्छित नाहीत, ज्या गोष्टींचा उपभोग ते घेत नाहीत त्या गोष्टी मी पूर्णपणे वर्जित केल्या आहेत .व्रतनियमांचे मी विनयपूर्वक, आळस न करता आचरण करते. मी नेहमी पतीपेक्षा जास्त निजणे,अधिक खाणे वा स्वत:चा थाटमाट करणे या गोष्टी टाळते. उदार अंत:करणाच्या कुंतीबद्दल कधीही वाईट बोलत नाही. ब्राह्मण, स्नातक,गडी माणसे, दासी हजारोंनी होत्या, त्या सर्वांकडे माझे पूर्ण लक्ष असे. पांडवांच्या आयव्ययाची मला पूर्णपणे माहिती होती. माझ्यावर कुटुंबांचा, राज्यातील अंत:पुराचा भार टाकून पांडव आपापल्या कामात गढून राहात. दिवस आणि रात्री पांडवांचे मन संभाळीत असता मला दिवस आणि रात्र सारखेच झाले आहेत. मी पतीच्या आधी उठते व नंतर झोपते.पतीसारखे सर्व जगात दैवत नाहे. त्याच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व त्याच्या अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो." या नंतर तिने सत्यभामेला श्रीकृष्णाचे प्रेम मिळवण्याकरिता काही tips दिल्या आहेत.त्यातील दोनतीन पाहू. " कृष्णाचे जे आवडते, त्याच्यावर प्रेम करणारे लोक असतील त्यांना विविध उपायांनी भोजन घाल, त्यांची व्यवस्था ठेव. जे कृष्णाचे द्वेष्य, उपेक्ष्य व त्याला अहितकारक असे लोक असतील त्यांच्यापासून चार पावले दूर रहा, कृष्ण तुझ्यजवल जे काही बोलेल ते त्याने गुप्त ठेवावयास सांगितले नसले तरी ते स्वत:च्या अंत:करणातच ठेव. ते तू कोणाशी बोललीस व ते तुझ्या सवतींच्या कानावर गेले आणि ते त्यांनी कृष्णाला सांगितले तर तो तुला वेंधळी समजून तुझ्याविषयी उदासिन होईल "
(द्वापारयुग, दुसरे काय ?)

वज्राघातांची परंपरा

द्रुपद राजाची मुलगी, पाच जगद्जेत्या वीरांची पत्नी, श्रीकृष्णाची प्रिय भगिनी, सुंदर व सद्गुणी द्रौपदी; खरे म्हणजे तिला काहीच दु:ख भोगावे लागावयाचे कारण नव्हते. पण नियतीने तिच्यावर कठोर प्रहार केले. पहिला द्युतप्रसंग, गांधारीमुळे ती त्यातून सुटली. वनवासात जयद्रथाचे तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला,पांडव वेळेवर आल्याने तो फसला. खरे म्हणजे भीम त्याला मारूनच टाकणार होता. पण तो धतराष्ट्राचा जावई होता व आपली बहीण विधवा होऊ नये म्हणून युधिष्टिराने त्याला सोडून दिले. तिसरा विराटाच्या घरी कीचकाचा. तिने भीमाला सांगितले की " तुम्हाला अज्ञातवासाच्या काळात आपण प्रगट होऊ याची भीती वाटत असेल तर तुम्ही गप्प बसा. उद्या सकाळी कीचक मेलेला नसेल तर मी विष खाऊन जीव देईन." भीमाने रात्रीच कीचकाला ठार केले. शेवटचा, युद्ध संपल्यावर, अश्वत्थाम्याने रात्री तिची मुले मारून टाकली ! स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी !!

साभार :- माननीय शरद जी यांनी लिहिलेला लेख कॉपी पेस्ट करून प्रकाशित केला आहे. धन्यवाद!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी यापूर्वी शरद जी यांचे काही लेख कॉपी पेस्ट करून इकडे प्रकाशित केले होते. आता ते हटवलेले दिसत आहे. अॅडमिन किंवा वेमा यांनी सुचना केली असती तर बरे झाले असते. हा लेख टाकला नसता. पहिल्याच लेखात मी हरकत कळवण्यासाठी सांगितले होते. आता मला म्याऊ चा विपू आला तेव्हा हे लक्षात आले.