कधी दाटे मनात गहिवर कधी हास्याची लाट आहे
सोडून गेले सगेसोयरे अंधाराची साथ आहे
दूर टेकडीवर होता महाल त्यात होती सुवर्णशय्या
इंद्रालाही लाजवेल असा माझा थाट होता
नियतीची फिरताच चक्रे होते नव्हते सगळे गेले
सर्वस्व व्यापले अंधाराने राज्य संपले खचली हिम्मत
अंधाराच्या मगरमिठीतच प्रकाशाची कळली किंमत
दागिना
पाहिले जेव्हा तुला तेव्हाच झालो मी कवी
शब्द होते ओठांवरी नव्हती जवळ पण लेखणी
पाहिल्या कित्येक ललना नाही तुझ्यासम एकही
पक्षीही पाहून तुजला गीत गाऊ लागले
अन अशा या शांत वेळी मेघ बरसू लागले
ऐक तू आता जरा माझ्या मनातील भावना
पण गोठले ओठात शब्द पाहून गळ्यातील दागिना
काजवा
डोळ्यात तुझ्या दिसतात मजला चंद्र आणि चांदण्या
अजूनही न कळे मला तू सत्य की मनातील कल्पना
कल्पनांच्या या जगातील चंद्राळलेली रात्र तू
अन तुझ्यातच चमकतो मी स्वप्रकाशी काजवा
"मी" माझ्यातली..
सहजच फोन केला माझ्या सेमिनारला गेलेल्या मैत्रिणीला
म्हटलं बाई, कशी आहेस..
खाणं, पिणं, रहाण्याची व्यवस्था कशी आहे..बरी आहे..?
ती उत्तरली, झकास, अगदी उत्तम
हाॅटेल मस्तच आणि रुम मधे सोबतीला कोणी नाही, हे तर अति उत्तम...
नाहीतर बिन ओळखीच्या, जराशा ओळखीच्या कुणीतरी एकीने सोबतीला यावं..
आणि सोबत म्हणता म्हणता तिच्यासवे आणखीनंच एकटं व्हावं…
तशी काही वाईट नसते ती, चांगलीच असते..
पण आपली आपली नसल्याने तीही कानकोंडी होऊन बसते…
इसरु लागली कशी ही नाती,
कधी काळी रगताची जी व्हती,
मायबापानं ज्यानला आपल मानलं,
तिच नाती बघ निघाली खोती,
तिच नाती बघ निघाली खोती ..
फोडा परीस बघ जपल हो जीनं,
बोट धरुन चालाया शिकिवलं ओ तीनं
तीच माय आता रडाया लागली,
भिताड धरुन बघ चालाया लागली ..
इसरु लागली अशी ही नाती ..
खाऊसाठी रोज रुपाया दिला हो जीनं,
हिशेब प्रेमाचा न्हायी मागितला ओ तीनं,
आतुरलेली माय ती नातवांच्या भेटीसाठी,
महाग झालीय बघ साद्या औषिदासाठी ..
इसरु लागली अशी ही नाती ..
पाय सरावले रस्त्याला
मी चाललो, चाललो इतका की
रस्ता ओळखीचा झाला
दुसरी वाट धरावी तर
पाय सरावले रस्त्याला ||ध्रू||
खाच खळगे नेहमीचे झाले
नवे नव्हते वाटले
अडथळे तसेच होते
पायात काटे खुपसले
काट्यांनी तरी जावे कोठे
त्यांना कोण सोबती मिळाला?
पाय सरावले रस्त्याला ||१||
अडचणी अनंत आल्या
उभ्या राहील्या समोर
नेट लावून सामोरी गेलो
प्रश्न अनेक पुढे कठोर
जंजाळ पसरले समोर असता
एक पक्षी अचूक उडाला
पाय सरावले रस्त्याला ||२||
द्वारका
नसोत अंधाराचे मिणमिणते सांजदिवे हे
नकोत करपवणारी आठवांची संध्याछाया
घनगर्द क्रुष्णमेघांची नकोच दाट ही वस्ती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती
नात्यांना अर्थ देणारी ही गूढरम्य स्तोत्रे
गुणगुणता काहि ओळी थरथरती ओली गात्रे
नवलाख दिव्यांनी होई नित्य जिथे आरती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती
नवा व्यासहि स्तब्ध ,असे काव्य जेथे
बालांच्या ओठि गीता क्रुष्णास पडे साकडे
कर्त्याच्या मोक्षासाठी कर्माची नच आहुती
अशी द्वारका माझी स्वप्नांची कोवळी नाती
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही
शोधतो व्यक्तीला, जो प्रश्न सोडवेल
शोधतो स्वतःला, जिथे आनंद पसरेल
शोधतो स्वप्नांना, तिथे आसरा भेटेल
शोधतो जागेला, जिथे भोजन मिळेल
सारे काही मुक्याने...
०१.. अपरिपक्व मी आततायी
बेताल उद्रेक माझा
परि शांत राहुनि ती
तोल साधते मुक्याने…
०२.. होताच भांडणे ती
अद्वैत विस्कटे आमूचे
नाही चकार शब्द
ती द्वैत सांधे मुक्याने...
०३.. प्रत्येक विवादा अंति
जाति ताणली नाती
शतशब्द व्यर्थ माझे
ती जिंकते मुक्याने…
०४.. ऐकून सर्व या बाबी
मी भासे तुम्हांस पापी
या आशेने भांडतो मी
ती भांडते मुक्याने…
ती
पानांवर अलगद थेंबी ती आरसपानी होते
.......ती अशीच उमटत जाते
कुसुमांच्या बहरातूनही काटेही पेरीत जाते
......ती अशीच वेडी असते
सुंदरता हाती धरुनी ओंगळास थारा देते
......ती सदा मनस्वी असते
सुंदरासुंदरापलिकडली व्यक्तता केवळ असते
....... ती कधीही कृत्रिम नसते
प्रिय स्पर्शाने अनामिक भावना मनी उमटते
....... ती अशीच बहरत जाते
जावळातून तान्हुल्याच्या ती गंधीत होत रहाते
.......ती अशीच शब्दी येते
भाकरीत दिसते कधी ती, भुई सारवताना येते
.....ती कविता अविरत असते