विठ्ठल

बहुं शेतात राबावें

Submitted by नवनाथ राऊळ on 14 June, 2015 - 01:34

बहुं शेतात राबावें । कष्ट अपार करावें ।
नाम मुखीं तें धरावें । हरी पांडुरंग ॥१॥

वावरांस नांगरावें । तेथ बियाणे पेरावें ।
विठ्ठलासि आळवावें । श्रमपरिहारां ॥२॥

निगा शेताची करावी । माया मायेची धरावी ।
चित्तीं माऊली स्मरावी । हाचि नित्यनेम ॥३॥

भिन्न नोहें कर्म पुजा । हरिवीण कोण दुजा ।
वर्षवीं पर्जन्यराजा । विठु मायबाप ॥४॥

पांडुरंगकृपा होई । कीर्तन रंगात येई ।
जन्म शिवारांत घेई । हिरवें सुवर्ण ॥५॥

भात जोंधळा बाजरी । शाकें नानाविध तरी
गजर नामाचा करी । हरिदासमेळा ॥६॥

अंगणी धानाची रास । पूर्णब्रम्हाची आरास ।
भीमातीरी विष्णूदास । जैसें मेळविलें ॥७॥

शब्दखुणा: 

भक्तीमार्ग कैंचा

Submitted by नवनाथ राऊळ on 11 June, 2015 - 01:47

भक्तीमार्ग कैंचा । नेणों आम्हां जाण ।
विठूचें स्मरण । अखंडित ॥१॥

हरीनामजप । आम्हांसी पैं ठावा ।
भक्तीचा पुरावा । नसें पाशीं ॥२॥

परमार्थामृत । वर्णियेलें श्रेष्ठ ।
तयाहूनी मिष्ट । हरीनाम ॥३॥

नाथ म्हणें भक्ती । उत्तुंग शिखर ।
आम्ही हो पामर । पायथ्यासि ॥४॥

शब्दखुणा: 

नाथ वेडा

Submitted by नवनाथ राऊळ on 9 June, 2015 - 00:12

श्रीधर श्रीरंग । हरी पांडुरंग ।
गातसे अभंग । नाथ वेडा ॥१॥

पांडुरंगी कळां । लागलासे लळा ।
जाहलासे खुळा । नाथ वेडा ॥२॥

गजर नामाचा । गगनीं भिडला ।
तल्लीन जाहला । नाथ वेडा ॥३॥

भजतो विठ्ठल । पुजतो विठ्ठल ।
चिंततो विठ्ठल । नाथ वेडा ॥४॥

अधीर गा चित्त । कंठ दाटलासे ।
वाट पहातसे । नाथ वेडा ॥५॥

तुजलागी हरी । विनवणी करी ।
हट्ट येक धरी । नाथ वेडा ॥६॥

नको विठूराया । नको अन्य काही ।
द्वारी उभा राही । नाथ वेडा ॥७॥

दर्शनाचे दान । हे कृपानिधान ।
मागतो अजाण । नाथ वेडा ॥८॥

शब्दखुणा: 

विठ्ठल विठ्ठल

Submitted by नवनाथ राऊळ on 8 June, 2015 - 07:07

विठ्ठल विठ्ठल । नाम हेचि मुखीं ।
अवघाचि सुखी । भवताल ॥१॥

नामाचा महिमा । काय म्यां वर्णावा ।
अगाध जाणावा । सकळांनी ॥२॥

नाथ म्हणे माझा । सखा विठुराया ।
उद्धरीं जगा या । सदोदित ॥३॥

शब्दखुणा: 

पूर्णकाम !

Submitted by पुरंदरे शशांक on 2 November, 2014 - 22:33

पूर्णकाम !

नामाचा गजर | विठ्ठल विठ्ठल |
सुखचि केवळ | तुकयासी ||

हाकारी सदैव | विठू धाव आता |
पातला तो स्वतः | देहूग्रामी ||

का रे आरंभिला | नामाचा गजर |
रात्रंदिन थोर | सांगे मज ||

काय उणे तुज | काय देऊ बोल |
देव उताविळ | पुसतसे ||

तुका हासतसे | विठ्ठलाच्या बोला |
म्हणे जीव धाला | तुझ्या नामे ||

आता काही नसे | संसारी मागणे |
एक तेही उणे | असेचिना ||

अवघा भरला | तूच जळी स्थळी |
उणीव वेगळी | काय सांगो ||

तुकयाच्या मुखे | अमृताची बोली |
स्वये ती चाखली | विठ्ठलाने ||

जागोजागी जन | मागताती काही |
विरळाचि पाही | तुकोबा तू ||

न मागे काहीच | ऐसा पूर्णकाम |

'विठोबा'

Submitted by dr.sunil_ahirrao on 11 July, 2014 - 01:56

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

पारखोनी घे जरा तू भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा

शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

डॉ.सुनील अहिरराव

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

Submitted by पाषाणभेद on 24 December, 2013 - 20:34

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला?

का रे बा विठ्ठ्ला का न भेटी मला? ||धृ||

गेलो तुळशी मंजीरा घ्याया
तेथे न तू गावला राया ||१||

गेलो राऊळी शोधाया
शोध व्यर्थ गेला वाया ||२||

चंद्रभागेकाठी तू न सापडेना
तुझ्याविण मन शांत होईना ||३||

शोध घेतला शोध घेतला
अंती नाही तू भेटला ||४||

पाषाण म्हणे का शोधसी इथेतिथे
चित्ती तुझ्याच विठ्ठल वसे ||५||

- पाभे

वारी

Submitted by मधुरा आपटे on 2 August, 2013 - 03:06

पांडुरंगाची वारीला जाण्यासाठी बरीच जुळवा जुळव चालू होती. कारण त्याने ठरवलं होतं की काहीही करुन यावर्षी वारीला जायचच आणि पांडूरंगाचं दर्शन घ्यायचच. वारीला जाणारी मोठी दिंडी दरवर्षी गावातून निघायची. आपापला लवाजमा घेऊन, पूढच्या प्रवासाचा शिधा घेऊन गावातून बरेच वारकरी वारीला दरवर्षी हमखास जायचे. छोटी- मोठी सगळी माणसं त्या दिंडीत सहभागी व्हायची. गेल्या वर्षीच पांडूने पडक्या वाड्याच्या मागे असलेल्या विठ्ठलाच्या देवळात शप्पथ घेतली होती की मी पंढरपूरला येऊन तुझी भेट घेईन. त्या विठ्ठलाची आणि पांडूची खास दोस्ती होती. अगदी काहीही झालं तरी पांडू रोज न चूकता त्या देवळात जायचा. त्याची पूजा करायचा.

विषय: 
शब्दखुणा: 

मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

Submitted by पुरंदरे शशांक on 30 June, 2013 - 04:59

मग तू अवघाचि सुखरुप होसी ....

वैशाखाचं कळाकळा तापणारं ऊन केव्हाच संपून गेलंय, इतकंच काय एखाद-दुसरा सुखद वळिव हि कोसळून बराच काळ लोटलाय .....ज्येष्ठातल्या मोठ्ठ्या पावसाचे शिंपण झाल्याने पेरण्याही जोर धरु लागल्यात ....

आता दिसताहेत ते आभाळभर तरंगणारे काळे, काळे ढग .... खाली जमिनीवर उमटलेली छानशी, नाजुक हिरवळ आणि जागोजाग जमा झालेली पाण्याची छोटी छोटी तळी....
चैत्रातली तांबूस्-पोपटी पालवी जाऊन चांगली हिरवीगाऽर होऊन झाडं झुलताहेत.... रानात फुललेला पळस्-पांगारा आता शेंगाही धरु लागलाय... गुलमोहोर मात्र अजूनही लालेलालच आहे - बहरलेला... कसं एक नवचैतन्य पसरलंय आसमंतात ....

पंढरीचे सुख वर्णावे किती

Submitted by परिमल गजेन्द्रगडकर on 5 February, 2012 - 10:08

लावोनिया चंदन उटी मणी कौस्तुभ शोभे कंठी|
भक्ताचिया साठी युगे अठ्ठावीस उभा जगजेठी |

शोभे तुळशी माळ ज्याचे गळा|
राजस सुकुमाराचा मज लागो लळा|

वाळवंटी जमे वैष्णवांचा मेळा|
पाहावा सुख सोहळा डोळे भरोनिया |

पंढरीत होती साऱ्या संतांचिया भेटी |
वैकुंठ अवतरे भूवरी चंद्रभागे काठी |

अवघे संत गाती ज्या पंढरीचे महती |
फिकी तिच्यापुढे इंद्राची अमरावती |

©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
माघ शुक्ल एकादशी शके १९३३
(२ फेब्रुवारी २०१२)

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - विठ्ठल