शब्दसाम्राज्यींचा राजा
शब्द गाथा वेलीवर
फुले बहरासी येती
परिमळ दाहीदिशा
लोक वेडावून जाती
शब्द कधी आर्तभरे
मधु साजिरे गोजिरे
राग अनावर होता
रौद्र रुपाही नावरे
शब्द झुंजती धडक
विठ्ठलासी थेट धाक
कधी पायी लोळुनिया
विठू अंकी पहुडत
शब्द कडाडे आसूड
जनलोका सुनावत
कधी पाठीवरी हात
चंदनाला लाजवीत
शब्द साम्राज्यींचा राजा
तुकाराम चक्रवर्ती
शब्द सारोनिया मागे
भाव वैकुंठा पोचती
शब्द सारे अलौकिक
वर्णवेना बालकासी
शब्द विरता उराशी
सावळीच कासाविशी
एक लेश विठ्ठलाचा
गाथा अभ्यासिता जरी
हाता न ये ती विरक्ती
तरी समजून घ्यावे
प्रेम प्रपंचाचे प्रति
अभंगाने हेलावून
नाही जात भारावून
तरी चरणी तुक्याच्या
दिले नाहीच झोकून
एक लेश विठ्ठलाचा
जरी नये ह्रदयात
तरी व्यर्थ सारे होई
कथा किर्तनी रमत
तुका आकाशाएवढा
नको आपुली प्रशस्ती
पाया लागोनीया मागू
भाव दृढ तुक्या (हरी) प्रती
आज शुक्रवार दिनांक ६ जुलै २०१८ . आज अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्त्तीत रममाण होण्याचा पहिला दिवस. संत ज्ञानराज माउली आणि संत तुकोबा पालखी सोहळ्याचा शुभारंभ ।
'साथ चल' उपक्रमातून 'पुंडलिक भक्त्ती ' समजून घेण्याचा प्रयत्न . वृध्दाश्रमाच्या सुखसोयी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा, वृद्धाश्रमांची गरज उरणार नाही असा समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर पुंडलिक समजला असे म्हणता येईल .
'वारी ' च्या आगमनाने असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालू लागले , राजकारणात समाजकारण आणण्याचे ध्येय ठेवीत जेंव्हा सत्ताधारी या सोहळ्याकडे पाहतील तो खरा ' सोनियाचा दिनू '
तू चि गा विठ्ठल....
गाथेमाजि स्वये । ठायी ठायी देखा । नित्य पाठीराखा । दीनबंधू ।।
शब्दाशब्दांतून । जागवी साधका । हात देसी निका (चांगला, सुयोग्य ) । भाविकांसी ।।
सगुण निर्गुण । आम्हा विलक्षण । दाविसी तू खूण । नेमकीचि ।।
वैराग्याचे फळ । भक्ति भाव प्रेम । दान अनुपम । काय वर्णू ।।
वैकुंठीचा राणा । अवतरे शब्दी । सकळही सिद्धी । पावलीसे । (प्राप्त झाली) ।।
नसे थोर काही । आम्हालागी अन्य । मायबाप धन्य । तूंचि आम्हा ।।
तूंचि गा विठ्ठल । प्रेमचि केवळ । सोयरा सकळ । जिवलग ।।
घडो संतसंग
तुकोबाचा भाव । जिही सामावला । मज तो भावला । पांडुरंग ।।
ज्ञानियाचे प्रेम । मूर्तिमंत ठाके । विटेवरी निके । भीमातीरी ।।
नामदेव सखा । स्वयमेव झाला । कोण त्या विठ्ठला । जाणू शके ।।
संतांचे संगती । जाई पंढरीसी । अर्पावे स्वतःसी । विठूपायी ।।
न जाणे निर्गुण । नाकळे सगुण । एकचि ते खूण । शुद्ध भाव ।।
शुद्ध भाव एक । रूजता अंतरी । स्वये तो श्रीहरी । ठायी पडे ।।
संतमुखे वर्म । कळो आले साचे । येर ते न रूचे । कृत्रिमसे ।।
घडो संतसंग । सर्वदा विठ्ठला । न मागे तुजला । दुजे काही ।।
सावळयाची करणी
सावळ्या विठ्ठले | करणी ही केली |
सुद हारपली | मतिचीही ||
चालता बोलता | उठता बसता |
जागता निजता | विठू देही ||
लागिरले ऐसे | अंगोपांगी पिसे |
मंत्र तंत्र कैसे | व्यर्थ जाले ||
हारपता बुध्दी | चमत्कार जाला |
रुप अरुपाला | साकारले |
लोपे भूक तान | मिटे देहभान |
वैकुंठगमन | जितेपणी ||
दत्तात्रय साळुंके
कधी कृष्णरंग तू कधी पांडुरंग
सदा रंगहीन नि सदा सर्वरंग
निर्गुण म्हणता तुला रंग नाही
सर्वांना खेचसी काळ्या डोही
सगुण म्हणता तुझा श्वेत रंग
साऱ्याचा उगम तूच रे श्रीरंग
दोन्ही तुझे ठायी काळा नि पांढरा
मध्ये कुठेतरी असे आम्हाला आसरा
जगता सगुण मी आहे पांडुरंग
मरता निर्गुण मी होई कृष्णरंग
©मनीष पटवर्धन
मो. ९८२२३२५५८१
देव भक्त
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत
देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण
भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...
|| विठू दादा ||
भीमेचीया तटा
उभा विठू दादा
रोवूनिया पदा
युगे युगे ||
काळाला करडा
असे त्याचा धाक
पाप वाहे भाक
दूर पळे ||
दु:खात सावूली
धरे डोईवरी
कर्तव्य कसुरी
नावडे त्या ||
हसतो खेळतो
संगतीने येतो
जीवनाला देतो
अर्थ गोड ||
हाती नसे चक्र
अथवा की गदा
प्रेमाने सर्वदा
मार्ग दावी ||
कृपाळू दयाळू
सदा लोकपाळू
होई कनवाळू
प्रियजना ||
विक्रांते जाणला
हृदयी धरिला
म्हणुनी कळला
काही पथ ||