माय मराठी
माय मराठी
मराठी लळे लाविले माय ऐसे
मनाच्या तळी प्रेम धारा विशेषे
स्वये ज्ञानियाचे कृपादान जेथे
तुकाराम बोले विठू डोलविते
वीरा शाहिरीने रणा जागविले
जिथे लावणीने मना मोहविले
विविधा कळा नाटके नौरसीची
गुणा खाणिया व्यापी या जीवनाची
बहु थोर सारस्वता जन्मदात्री
विशेषे गुणे डोलते या धरीत्री
असे रांगडी माय सह्याद्रिकाची
विदर्भा तशी मोकळी मन्मनाची
किती स्वैरता धावता चौदिशांसी
प्रवाही गुणे भूषवी सर्व देशी
मना रंजवी ओवी बहिणा विशेषी
वरी सार ते दाविते जीवनासी