माय मराठी

Submitted by पुरंदरे शशांक on 27 February, 2021 - 02:04

माय मराठी

मराठी लळे लाविले माय ऐसे
मनाच्या तळी प्रेम धारा विशेषे
स्वये ज्ञानियाचे कृपादान जेथे
तुकाराम बोले विठू डोलविते

वीरा शाहिरीने रणा जागविले
जिथे लावणीने मना मोहविले
विविधा कळा नाटके नौरसीची
गुणा खाणिया व्यापी या जीवनाची

बहु थोर सारस्वता जन्मदात्री
विशेषे गुणे डोलते या धरीत्री
असे रांगडी माय सह्याद्रिकाची
विदर्भा तशी मोकळी मन्मनाची

किती स्वैरता धावता चौदिशांसी
प्रवाही गुणे भूषवी सर्व देशी
मना रंजवी ओवी बहिणा विशेषी
वरी सार ते दाविते जीवनासी

अशा माय अंकी किती जन्म येवो
पुरेना तरी सार्थकी सर्व लाहो
बरे पांडुरंगी सदा नाम गावो
हिचे गुण गाता स्वये विसरावो

.............................................................................

लळे....प्रेम

नौरस....शांति, शृंगारादी साहित्यातले नवरस

सारस्वत.....साहित्यिक

चौदिशांसी... महाराष्ट्रातील चहू दिशा, महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात

बहिणा...सरस्वती कन्या बहिणाबाई चौधरी

अंकी.... मांडीवर, कुशीत

लाहो... मिळणे, प्राप्त होणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच सुंदर

"लाभेल आम्हास भाग्य बोलतो मराठी"

मस्तच.