घडो संतसंग
तुकोबाचा भाव । जिही सामावला । मज तो भावला । पांडुरंग ।।
ज्ञानियाचे प्रेम । मूर्तिमंत ठाके । विटेवरी निके । भीमातीरी ।।
नामदेव सखा । स्वयमेव झाला । कोण त्या विठ्ठला । जाणू शके ।।
संतांचे संगती । जाई पंढरीसी । अर्पावे स्वतःसी । विठूपायी ।।
न जाणे निर्गुण । नाकळे सगुण । एकचि ते खूण । शुद्ध भाव ।।
शुद्ध भाव एक । रूजता अंतरी । स्वये तो श्रीहरी । ठायी पडे ।।
संतमुखे वर्म । कळो आले साचे । येर ते न रूचे । कृत्रिमसे ।।
घडो संतसंग । सर्वदा विठ्ठला । न मागे तुजला । दुजे काही ।।
संतसंग
संताचे सांगाती |
दोष विलोपत |
निवळीले चित्त |
परीसस्पर्शे ||
संत वाणी होता |
विठू पाघोळला |
सखा माझा जाला |
हृदयीचा ||
दंभ जळू जाता |
मिटले मीपण |
मऊ होइ मन |
मेणाहून ||
सोयरे सगळे |
नोहे दुजाभाव |
प्रेमाचाच भाव |
सर्वठायी ||
पवित्र हा देह |
करीती तत्काळ |
पुण्याचा सुकाळ |
सर्वकाळ ||
हारपली भूक |
संसार सुखाची |
होय परमार्थाची |
पराकोटी ||
देव भक्त
पहाटेस झाडलोट
सडा घालूनी अंगणी
रखुमाई लगबगी
शेण्या लाविते चुल्हाणी
पाणी अाणी कावडीने
धारा काढी अावडीने
विठू हरखे अंतरी
संतसंगाच्या ओढीने
दिंडी येता पंढरीस
विठू धावला वेशीत
प्रेम भक्तांचे अद्भुत
ओढी संतांना कुशीत
देवसंतांचे मिळणी
येत भाविका उधाण
गेला गेला जीवभाव
एकमेका लोटांगण
भक्तीसुखे लोभावला
देवे त्यागिले वैकुंठ
युगे अठ्ठाविस उभा
भक्तांलागी तो तिष्ठत...