काव्यलेखन

परी

Submitted by नितिन हे. वैद्य on 19 August, 2023 - 17:56

लाडके गोड किती तू परी, परी ग आलीस तू भूवरी
मनात माझ्या आज बरसल्या आनंदाच्या सरी

हसलीस तू तर हसवतेस मज
रडलीस तू तर बावरते मन
डोळ्यांतील हे भाव निरागस
स्पर्शती अंतरी, परी ग आलीस तू भूवरी

हातांवर ह्या दोन रांगशील
शब्द नवे-नवे तू शिकशील
छेडतील ही इवली बोटे
हृदयाच्या तारी, परी ग आलीस तू भूवरी

उनाड अल्लड अवखळ होशील
भातुकलीतील खेळ मांडशील
नको म्हणूनही पुढे धावशील
जाशील मग परघरी, परी ग आलीस तू भूवरी

एक घर

Submitted by द्वैत on 17 August, 2023 - 09:53

जेव्हा जेव्हा माझे मन धावे ओल्या वाटेवर
दूर डोंगर झाडीत मला दिसे एक घर

घर कौलारू साधे वाट पाहून थकले
आडवळणावरी ह्या नाही कुणी फिरकले

शीळ घालीत वाऱ्याची आली झुळूक अंगणी
तिला ठाऊक असाव्या काही जुन्याआठवणी

जरा डोळा लागला नि ओढा खळाळला मागे
ऋतू आले ऋतू गेले घर सदोदित जागे

काय राखते कळेना घर बंद दाराआड
सांज झाली की हळूच डोकावेल वृद्ध माड

आता घराचे सोबती सावल्यांचे खुळे भास
काही मोडक्या खिडक्या हळू हळू घेती श्वास

घर एकटे एकटे कसे कुणा ना दिसले
आणि त्याच्या पडवीत कधी रान उगवले

पल्याड

Submitted by अभिषेक_ on 17 August, 2023 - 03:53

एक धुंद सकाळ
प्रकाशाने सजलेली
अंधार मागे सारता सारता
दवबिंदुंनी भिजलेली..

एक तप्त दुपार
उन्हामध्ये विरलेली
झाडाखालील सावलीच्या
शोधामध्ये सरलेली..

एक हळवी संध्याकाळ
अस्ताकडे झुकलेली,
अंधाराची सोबत करण्या
प्रकाशास मूकलेली..

एक अकेली रात्र
काळोख विणण्यात जूंपलेली,
उजेडाची वाट बघत
अंधारातच संपलेली..

एक सूखी माणूस
हसताना दिसलेला,
अन् एकांतात डोळ्यांचे
काठ पुसत बसलेला..

शब्दखुणा: 

कविता

Submitted by मीन्वा on 15 August, 2023 - 02:25

कधी कविता भारंभार बोलतात
शब्दाला शब्द जोडतात
यमकांचे छंदांचे वृत्तांचे
अलंकार घालून सजतात
कधी एखाद्या नदीसारख्या,
ओसंडून वाहतात
कधी खळखळत, तर कधी संथपणे
कधी कधी कविता फुटतात
एखाद्या तुडुंब भरलेल्या धरणाचा
बांध फुटावा तशा
वेगात चिरत जातात कडे कपारी
आणि दगडालाही बोथट बनवतात
कधी कविता मोजकेच बोलतात
हिऱ्या मोत्यांसारखे शब्द गुंफतात
ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेतात
काही कविता मात्र... शब्दहीन
एक अक्षरही न बोलता
आपल्या आसपास वावरतात
मौनाची भाषांतरे कळणाऱ्या माणसांच्या

शब्दखुणा: 

चूक

Submitted by श्रीराम_देशपांडे on 8 August, 2023 - 23:05

चूक तर ही घरोघरी होते
वेगळ्यांची बरोबरी होते

वाद चर्चा घरोघरी होतात
ज्ञान वृद्धी कुणाघरी होते?

चूक असली जरी सदस्याची
टीका मात्र कुळावरी होते

आजच्या या युगात नेमाने
बेईमानी खुल्यावरी होते

टोचते तुज कुणीतरी जेव्हा
वेदना मज कुठेतरी होते

रोज रात्री तुझे स्मरण होते
भावना मग निलाजरी होते

व्यथा

Submitted by अभिषेक_ on 8 August, 2023 - 15:38

गेले निघून सारे, का मीच थांबलो होतो?
आशेत पावसाच्या, उन्हात पोळलो होतो

आताच का सुखांनी, हा डाव खेळला ऐसा
आताच आसवांना, हरवून बैसलो होतो

स्वप्नात कोणता जो, आलाप लावला होता
जागेपणी तयाला, गोंगाट बोललो होतो

इतकेच आरशाला, माझे ग सांगणे होते
पाणावताच दाखव, जे काल हासलो होतो

आले तसेच गेले, वस्तूंत साठले हासू
जगणे सुधारताना, जगणेच विसरलो होतो

गाडून टाकली मी, प्रेते जुनाट नात्यांची
जे मोक्षले कधी ना, त्यांनी झपाटलो होतो

शब्दखुणा: 

अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी

Submitted by द्वैत on 8 August, 2023 - 13:44

वारा येतो घेऊन धुळीची आवर्ते
पाचोळा धरतो फेर नदीच्या काठाशी
क्षितिजावर गर्दी निळ्याजांभळ्या मेघांची
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी

काळोख उतरतो फांद्याफांद्यांतून जसा
सावली लांबते झाडाची वेशीपाशी
दिवटीला विझत्या एक मिळेना आडोसा
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी

भवताल पेरतो बीज भयाचे कुठेतरी
उठतात कंपने खोल मनाच्या गाभारी
नजरेला होती सर्व दिशा धूसर धूसर
अन... अद्याप परतला नाही पक्षी घरट्याशी

आवाहन - ऑनलाईन कविसंमेलनासाठी

Submitted by अ. अ. जोशी on 7 August, 2023 - 02:58
तारीख/वेळ: 
8 August, 2023 - 02:51 to 14:29
ठिकाण/पत्ता: 
हा कार्यक्रम ऑनलाईन Google Meet वर असणार आहे. त्याबद्दल नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
पुण्याचे माजी चीफ ऑफिसर व लोकमान्य टिळकांनी गौरविलेले सामाजिक कार्यकर्ते कै आप्पासाहेब भागवत यांच्या १४१व्या जन्मदिनानिमित्त...

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

दुष्काळ

Submitted by दत्तात्रय साळुंके on 6 August, 2023 - 01:40

दिवसभर कोंदटलेल आभाळ
बर्फासारखा थंडगार वारा
वाटतं कधीही बरसतील धारा
पण पोकळ पर्जन्यभास सारा

पाऊस काय, पुढारी काय
अगदी बांधापर्यत येतात
अन् फक्त वचनं बरसतात
माणसं कुठं बरं चुकतात ?

टीचभर ओलीवर पेरलेल्या
आशा आकांक्षा वटतात
स्वप्नांचे धुमारे फुटण्या आधी
कायम माना टाकतात

वावराच्या तडा गेलेल्या आरशात
दिसतात विवश चेहरे ठिकरलेले
सैरभैर, धरणाच्या कामावर
खडीच्या ढिगा-यावर विखुरलेले

शब्दखुणा: 

आगळी वेदना

Submitted by अभिषेक_ on 5 August, 2023 - 13:21

उत्स्फूर्त होत्या कधी, आता मूक ज्या संवेदना
जागतात सवयीनेच रे, आता साऱ्या चेतना!

ठेच लागता “अजून एक!”, म्हणून गेलो मी पुढे
दैवाच्या कट-काव्यांची, कैसीच ही अवहेलना!

वाटेत खेळताना दिसली, पोरे भिकारी मला
फाटक्यातही हसणे त्यांचे, वाटे मज खरेच ना!

वेचलेले कधीकाळी एक, मोगऱ्याचे फूल मी
मुरझले; पण गंध त्याचे, हृदयी कधी भिनलेच ना!

ना उडताना हासलो, ना अडखळताना त्रासलो
वेदनाच नसण्याची माझी ही आगळी वेदना!

नको करु तू पर्वा, माझ्या दाटून राहण्याची
झालंच तर होईल काय, बरसेन मी; इतकेच ना?

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन