व्यथा

Submitted by अभिषेक_ on 8 August, 2023 - 15:38

गेले निघून सारे, का मीच थांबलो होतो?
आशेत पावसाच्या, उन्हात पोळलो होतो

आताच का सुखांनी, हा डाव खेळला ऐसा
आताच आसवांना, हरवून बैसलो होतो

स्वप्नात कोणता जो, आलाप लावला होता
जागेपणी तयाला, गोंगाट बोललो होतो

इतकेच आरशाला, माझे ग सांगणे होते
पाणावताच दाखव, जे काल हासलो होतो

आले तसेच गेले, वस्तूंत साठले हासू
जगणे सुधारताना, जगणेच विसरलो होतो

गाडून टाकली मी, प्रेते जुनाट नात्यांची
जे मोक्षले कधी ना, त्यांनी झपाटलो होतो


अक्षरगणवृत्तात लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न! सूचनांचे स्वागतच आहे.
गण: ताराप राधिका मानावा जनास मानावा
सूट: एका गुरु अक्षराऐवजी एकाच शब्दात सलग येणारी दोन लघु अक्षरे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिली आहे. आवडली.

एक छोटासा बदल सुचवू इच्छितो. पहिल्या ओळीत 'मी का च थांबलो होतो?' हे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. त्या ऐवजी 'का मीच थांबलो होतो?' असं केलं तर तुम्हाला हवा तो अर्थही यात येईल आणि व्याकरणही पाळलं जाईल.

धन्यवाद हरचंद जी तुमच्या मार्गदर्शनाबद्दल. मलाही त्याच ठिकाणी थोडी शंका होती, परंतु बोलीभाषेत “का” नंतर येणाऱ्या “च” मुळे पश्चातापाची तीव्रता अधिक प्रभाविपणे व्यक्त होत आहे असं मला वाटलं, पण व्याकरणासोबत तडजोड नको, तुम्ही सुचवलेला बदल मान्य! दुरुस्त केले. पुन्हा एकदा आभार _/\_