Submitted by द्वैत on 17 August, 2023 - 09:53
जेव्हा जेव्हा माझे मन धावे ओल्या वाटेवर
दूर डोंगर झाडीत मला दिसे एक घर
घर कौलारू साधे वाट पाहून थकले
आडवळणावरी ह्या नाही कुणी फिरकले
शीळ घालीत वाऱ्याची आली झुळूक अंगणी
तिला ठाऊक असाव्या काही जुन्याआठवणी
जरा डोळा लागला नि ओढा खळाळला मागे
ऋतू आले ऋतू गेले घर सदोदित जागे
काय राखते कळेना घर बंद दाराआड
सांज झाली की हळूच डोकावेल वृद्ध माड
आता घराचे सोबती सावल्यांचे खुळे भास
काही मोडक्या खिडक्या हळू हळू घेती श्वास
घर एकटे एकटे कसे कुणा ना दिसले
आणि त्याच्या पडवीत कधी रान उगवले
जेव्हा जेव्हा माझे मन धावे ओल्या वाटेवर
दूर डोंगर झाडीत मला दिसे एक घर
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता घराचे सोबती सावल्यांचे
आता घराचे सोबती सावल्यांचे खुळे भास
काही मोडक्या खिडक्या हळू हळू घेती श्वास
कसलं ठसठसणारं एकाकीपण....