ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
पुण्याचे माजी चीफ ऑफिसर व लोकमान्य टिळकांनी गौरविलेले सामाजिक कार्यकर्ते कै आप्पासाहेब भागवत यांच्या १४१व्या जन्मदिनानिमित्त...
ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
पुण्याचे माजी चीफ ऑफिसर व लोकमान्य टिळकांनी गौरविलेले सामाजिक कार्यकर्ते कै आप्पासाहेब भागवत यांच्या १४१व्या जन्मदिनानिमित्त...
आहे तुझ्या घराच्या,रस्त्यात आज गर्दी..
मेणा तुझा निघाला,आली आताच वर्दी..
लावण्य पाहण्यासी, कित्येक येत होते..
हवेशे आणिक नवशे,थोडे तयात दर्दी..
जोतास बैलजोडी,मातीत फाळ आहे..
पेरे कुणी बियाणे,करण्या जमीन कर्दी..
मणले मणा मणाने, सोने तिच्या महाली..
नशिबात आमच्या हो,फुटकीच एक अर्दी..
लुटती असे समाजा,कित्येक राजनेते..
भरल्यावरी घडा हा, होणार फक्त छर्दी...
इथे मृत्यच रेंगाळे तुला मी पाहण्यासाठी
जीवाचे दान देतो तो तुला मी साहण्यासाठी..
तुझ्यासाठी कधीकाळी जिथे मी राहुनी गेलो
घरे बोलावती मला पुन्हा तिथे मी राहण्यासाठी...
आठवांची कुपी होती तिला मी लावला धक्का...
कुपीतून सांडले अत्तर जरा गंधाळण्यासाठी....
तारणासाठी कुठे काही आता उरले न मजपाशी...
का बरे तिथे गेलो उधारी मागण्यासाठी...?
कुणाचे कोण ना उरले अशा दुनियेत पाषाणी..
जवळ येती इथे सारे हिते जोपासण्यासाठी...
जगाची रीत आहे ही गुन्हे काळासवे विरती...
तूर्तास घातला बुरखा चेहरा झाकण्यासाठी...
बोलघेवडी कविता त्यांची
ऐकली रानाने तन्मयतेने
सुखदुःखात एकमेकाच्या
अनुभवले हसणे रडणे
चांदणं लदबदलेला जोंधळा
आज काळवंडून गेलाय
रुपेरी शंब्दांचा सौदागर
निशब्दता पेरुन गेलाय
पोटरीतला गहू ओंबीत
हसणं विसरलाय
साळीच्या रानाचाही
पिवळा बहर हिरमुसलाय
बोलघेवडी साळुंकी आज
एकाकी मूक जाहली
हिरव्या बोलीच्या शब्दांची
हिरवी ओल निमाली
पुन्हा हीच माती
होईल प्रसवती
हिरवे राघू हळूहळू
येतील रानावरती
एखादी अभद्र कृती
नासवून टाकते सगळं.
प्राप्त परिस्थितीवरची
साधी एक प्रतिक्रिया;
पण होतं नव्हतं ते सारं
एका क्षणात पुसून जातं.
समोरून आलेला एक वार
तलवारी ऐवजी ढालीवर
पेलता आला असता तर...!
तर ही सगळी क्रूरता
अशी वर आली नसती.
मागे वळून पहाताना
लाज वाटत रहाते
कुठून आली, कुठे दडलेली
इतकी बिभत्सता???
सुसंस्कृततेचे सगळे लेप
खळाखळ आपल्या पायाशी
ढलप्यांनी पडत रहातात.
अन आपण सारेच खुजे होत
त्या ढलप्याच्या ढिगाऱ्यात
हळूहळू सापळे बनत जातो...!
वीज नाचावी ढगांमध्ये
तीच शांतता दोघांमध्ये
हसणे माझे कर्ज तुझेच
नको वसुलू आसवांमध्ये
‘मीच नाही का हाक दिली?’
सल ही कित्येक मनांमध्ये
आले मनी तर घे नाचुनि
वजन कसले पावलांमध्ये?
टाळलीस तू मैफिल जरी
वावर तुझाच गीतांमध्ये
अश्रू होते ओले जरी
भिजले न ते यातनांमध्ये
घाव तिचे जगाच्या ओठी
मजला रस ना अफवांमध्ये
जगलो तर हासतच होतो
दुःख कसले आठवांमध्ये?
नभ बरसता कुणी मिसळले
गंध हळवे भावनांमध्ये
सर्वच इथे सुशिक्षित कोणी हुशार नाही
सामील इथे होण्याचा माझा विचार नाही
जो तो करू पहातो वर्षाव चौकशींचा
पर्वा करायला पण कोणी तयार नाही
असली घरास माझ्या जरी कुंपणे रूढींची
माझ्या मनास मात्र कुठली किनार नाही
इथल्या वयस्करांना ही बाब ठाव नाही
चूकण्यास सारखे ते आता कुमार नाही
सौदा या जीवनाचा आहे जरा निराळा
कुठलीही स्वाक्षरी अन कुठला करार नाही
मी काय वाट पाहू दुसऱ्या भल्या क्षणाची
घालावयास इकडे दुसरी विजार नाही
असुदे सुखातला अन माझ्यातला दुरावा
हा तर विलंब आहे ही माझी हार नाही
बऱ्याच दिवसांनी एक रोमँटिक कविता झाली!!
कोण तू, माझी कुणी आहेस का?
स्वप्नजा.. जागेपणी आहेस का?
त्या सुगंधाचाच दरवळ आज.. अजुनी..
ब्रह्मकमळाची सखी आहेस का?
चाल नुपुरांची किती अलवार.. नाजुक!
चालुनी येते खरी आहेस का?
राग छेडी तार हृदयाचीच माझ्या..
अजुनी तू "रागा"वली आहेस का?
काल मज दिसलीस तू होती म्हणूनी..
आज वाटे, तू उद्या आहेस का?
---
डोळ्यात तुझिया दिसले आज
माझेच प्रतिबिंब मला,
परी न दिसला भवती एकही
प्रेमाचा तरंग मला..
प्रतिबिंब ही कसे म्हणावे?
हे तर केवळ रेखाटन!
आकृत्यांची रटाळ जुळवण
नाही कुठली रंगकला..
रेघाही सोडून संहती
झाल्यात पुसट जराश्या,
तुझ्या रंगांनी कधी श्रीमंत
वाटे आज भणंग मला..
बरं हार मानुनी; खंबीर मनाची
घ्यावी थोडी सोबत तर;
तोही बापुडा, आठवांत तुझ्या,
दिसे आज दंग मला!
छान असते सूत्र साधे पाळले तर
बोलताना शब्द जहरी टाळले तर
का गुलाबी रंग दिसतो त्या वहीचा
शेवटाचे पान जर तू चाळले तर
फार मोठे शल्य नाही या जगी बघ
जीवनाला चांदण्यांनी माळले तर
ने फुलांना आज वेड्या तू विकाया
मोल नाही रोपटे हे वाळले तर
मोगऱ्याचा हा तिढा सुटणार बहुधा
प्रेत माझे चंदनावर जाळले तर
- किरण कुमार