काव्यलेखन

कुंपण

Submitted by अनन्त्_यात्री on 16 November, 2023 - 11:13

चांदणठिणग्यांचे नभझुंबर
पहाटफुटणीत विझता विझता
शब्द गवसले- त्यांची पडझड
बघत राहिलो दिवस उगवता

शब्दाशब्दामधुनी वाटले-
येईल काही अमोघ उसळत
पण निष्प्रभ अर्थाचा खुर्दा
आला हाती.. बसलो मोजत

साखरझोपेच्या काठावर
शब्द भासले होते ओतीव
धग दिवसाची सोसून कळले
ते ही निपजले पोकळ, निर्जीव

लख्ख समजले पुन्हा यापुढे
भ्रमनिरास ना होऊ देणे
ओलांडून शब्दांचे कुंपण
अर्थनिरर्थापल्याड जाणे

दीपावलीच्या आगमनाने..

Submitted by @गौरी on 11 November, 2023 - 11:14

दीपावलीच्या आगमनाने, जुळावी नाती हरवलेली,
फराळाच्या मधुर गोडव्यात, एकत्र यावी मने जपलेली..

दीपावलीच्या आगमनाने, बालपणीच्या जागाव्या आठवणी,
वारसा पुढे सोपवताना, नव्या काही घडवाव्या आनंदुनी..

दीपावलीच्या आगमनाने, सुंदर रांगोळ्या सजाव्या अंगणी,
आकाशदिव्याच्या प्रकाशाची, त्यावर पखरण सप्तवर्णी..

दीपावलीच्या आगमनाने, सुखसमृद्धी वसो तव जीवनी,
प्रसन्न सुदृढ आरोग्याचे, वरदान तुवा द्यावे धन्वंतरीनी..

दीपावलीच्या आगमनाने, सरो जळमटे खिन्नतेची,
आत्मसुखाची प्राप्ती व्हावी, उजळावा प्रकाश अंतरंगी..

बाकी काही नाही

Submitted by किरण कुमार on 1 November, 2023 - 08:19

गडबड केली या ग्रहणाने बाकी काही नाही
सूर्य लपवला बघ चंद्राने बाकी काही नाही

रंग बदलला सर्पाचा पण दात विषारी आहे
कात टाकली असेल त्याने बाकी काही नाही

सगे सोयरे लोक आपले समजू नकोस भोळे
गळा कापतिल ते केसाने बाकी काही नाही

झळा उन्हाच्या खूप सोसल्या शेतकऱ्याने बहुधा
गहिवरला तो वर्षावाने बाकी काही नाही

पावसातली भेट तुझी अन आयुष्याची होळी
विसरत नाही दुर्दैवाने बाकी काही नाही

कायम होते त्याची बदली तरी सुधारत नाही
वागत जातो तो नियमाने बाकी काही नाही

जमलंच तर

Submitted by रघू87 on 1 November, 2023 - 07:31

जमलच तर....

जमलच तर.....
द्या पोटासाठी दोनवेळची, भाकर..
म्हणजे तुमच्यापाठून जिंदाबाद मुर्दाबाद
करत मूर्खासारख फिरता येईल

जमलच तर.....
द्या चार भिंती, हक्काच्या
म्हणजे मान खाली घालून जगणारी
नवी पिढी जन्माला घालता येईल

जमलच तर.....
द्या दिशाभूल करणार, शिछण
जे बुद्धीला चालना देणार नाही
कुठलाच नवा प्रश्न विचारण्याची

जमलच तर.....
द्या एक अशी आरोग्यव्यवस्था
ज्यात असेल एक खाट शेवटी
जिथे मरण थोड सुसह्य होईल

ऐ रंगरेज़ मेरे...

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 October, 2023 - 09:42

खरंतर रंगवायला दिली होती ती फक्त ओढणी. बाकी माझा पहनावा माझ्या आवडीचा, माझी ओळख सांगणाराच असायला हवा, नाही का? अगदी मोठ्या हट्टाने प्रियतमाच्या रंगात रंगवायला सांगितली होती. तेवढंच त्याला मोठेपणा दिल्यासारखंही होईल, चारचौघांत त्याची लाडकी म्हणून मिरवताही येईल, आणि माझी मी असताना वाटलं तर काढून बाजूला ठेवेन - अशी आपली माझी कल्पना!

पण जळलं मेलं लक्षण त्या रंगार्‍याचं आणि या कापडाचं! ओढणीवरचा त्याचा रंग नुसता कपड्यांवरच लागला नाही, तर
बघता बघता मी अंतर्बाह्य त्यात रंगून गेले! हा बसंती रंग असा पक्का बसला तनामनावर, की दुसरं काही दिसेसुचेनासं झालं!

कथा

Submitted by श्रीराम_देशपांडे on 30 October, 2023 - 00:35

कथा इतिहास सांगे शासकाची
कुठे आहे कहाणी मावळ्याची?

असंख्य एकलव्य येती जाती
पण इकडे जाण फक्त अर्जुनाची

नका ठेऊ यशानंतर कधीही
जराशीही अपेक्षा कौतुकाची

बदलता काळ घेऊन येत असतो
नवी ओळख जवळच्या माणसाची

जसे असतो तसे दिसतो तरीही
आपण करतो दुरुस्ती आरशाची

झलक दिसली मला सुंदर गुलाबात
.........तुझ्या आनंददायक चेहऱ्याची

शब्दखुणा: 

संध्येचा विझतो तारा

Submitted by द्वैत on 28 October, 2023 - 11:50

संध्येचा विझतो तारा
एकाकी दूर नभात
अन ओल्या कातरवेळी
हातातून सुटती हात

स्वप्नांचा चंचल पक्षी
घरट्याशी परतून येतो
क्षितिजाचा रंग गुलाबी
मग धूसर धूसर होतो

मोडून घरे वाळूची
माघारी फिरती लाटा
या कुठवर नेतील आता
थकलेल्या पाऊलवाटा

मी मिटून माझे डोळे
ओंजळीत धरतो पाणी
स्वर कंपीत अंधाराचा
मज ऐकू येई कानी

द्वैत

मी

Submitted by श्रीराम_देशपांडे on 26 October, 2023 - 04:28

कुणालाही शोधत नाही कधी मी
कुणाला सापडत नाही कधी मी

मी नावडता जरी नसलो कुणाचा
कुणाला आवडत नाही कधी मी

अनादर भावनांचा का करावा?
मनाला गुंतवत नाही कधी मी

अशक्त, कमकुवत नात्यांचा गुंता
उगाचच सोडवत नाही कधी मी

उचलले गेलेले मुर्दाड मुद्दे
मुखाने टोलवत नाही कधी मी

हवे तेव्हा घरी येऊन जाते
सुखाला बोलवत नाही कधी मी

समांतर

Submitted by vasant_20 on 25 October, 2023 - 14:31

गोल गोल वर्तुळात
सतत फिरायचं
फिरून फिरून परत
तिथेच यायचं
एखादा कोनही नको
उगाच बनलेला
दोन दिशेला जाऊन
अपूर्ण राहिलेला
त्रिकोण, चौकोन देखील
विशेष नाही
उगाच कशात तरी
कोंडायचं नाही!
समांतर रेषाच
मग बऱ्या वाटतात
निरपेक्ष सोबत,
अनंतापर्यंत देतात !!

काय जीवीतास ह्या महत्त्व आहे

Submitted by हर्षल वैद्य on 23 October, 2023 - 04:50

कोण मी, काय माझे स्वत्व आहे
काय जीवीतास ह्या महत्त्व आहे

कोणती अदृश्य शक्ती चालवे मज
काय सर्वा अंतरीचे तत्त्व आहे

कोठुनी मी आणतो अवसान उसने
जाणतो जरि हे फुकाचे कवित्व आहे

काय असती प्रेरणा मम अंतरीच्या
दाटलेले घनतमी अंधत्व आहे

वाटते उधळून द्यावे सर्व संचित
पायी प्रपंच शृंखलांचे दास्यत्व आहे

केवढे गा लाभले मज पूर्वजांचे
केवढे अन् तोकडे कर्तृत्व आहे

जाणतो घेणे अता नाही भरारी
मालकीचे किंचित् असे अस्तित्व आहे

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन