रिकामटेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवीन रोज थोडे थोडे
पिऊन जे दौडतील कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतील - टाळण्यास समीक्षकी डंख
कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते
घरापासून दूर कुठेतरी कोकणातल्या उघड्या रानात
भात कापलेल्या कोरड्या खाचरात भाताच्या बुडख्यात
आजू बाजूला ठोकलेल्या चौरस वाघरात
कोंबड्यां, कुत्री, घोड्यांच्या गराड्यात
आयत आकाराच्या मांडणीवर लोकरी अंथरुणं, पांघरुणं
आडोश्याला तीन दगडांचं चूलाणं,
हंडा, कळशी,पितळ्या, तांब्या, ताटल्या चारदोन
चुलीभोवती भांड्यांचं मेंढरागत रिंगण
असंच मल्लू धनगराचं उघड्या छताखाली देखणं राहणं
क्षितिजापल्याड
निःस्तब्ध शांत कातरवेळी
स्मृतींचा उडतो पाचोळा
मनात हुरहूर दाटे.
सैरभैर मी बावरा, खुळा
दूर क्षितिजावरती.
खुणवे गत आठवणींचा पसारा.
सावरता सावरता हरवतो मी.
घरपरतीची वाट
देते हाळी
करते मौन इशारा
एक अनामिक दुपार
असतात काही दुपारवेळा - निवांत, निष्क्रिय, आळसावलेल्या.
पानं पिवळी पडलेल्या एखाद्या अगदी जुन्या मासिकासारख्या..
जुन्या, तरीही ओळखीच्या.
आपुलकीचा गंध असणाऱ्या.
कधी कळत नकळत अगदी अस्पष्ट सुरावटीवर त्या रेंगाळतात -
अगदी अंधुकशी जाणीव होईल इतपतच असते ती सुरावट.
मन सुखावणारा सावल्या अन् कवडश्यांचा खेळ.
. एक अनामिक मंदसा सुगंध येतो,
मनाच्या हिंदोळ्यावर झोके घेत घेतो,
अन् अलगद लुप्त होतो...
भासे महावस्त्र | चिंधी जिंदगीची
जेव्हा कवितेची । हाक येते ।।
हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर
घालते फुंकर । हलकीशी ।।
हलकेच काही । आक्रीत घडते
बेडी निखळते । त्रिमितीची।।
तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते
आणि मग होते । महावस्त्र।।
ओठ हासरे जरी ठेवतो डोळ्यामध्ये खळखळ बाकी
मनात एका खोल तळाशी ती गेल्याची हळहळ बाकी
तहात गेले सारे काही जीव वाचला नसे थोडके
मृत्यू नंतर कुठे राहते रक्तामधली सळसळ बाकी
भव्य यशाचे वाटत पेढे गाव पालथे करून आलो
आणि पाहिली शेजाऱ्याच्या पोटामध्ये मळमळ बाकी
शेतामधल्या मालाला तो भाव मागतो चुकले कोठे ?
झोपडीतल्या पिल्लांसाठी किती राहते कळकळ बाकी
आयुष्याचे चटके बिटके नकोस विसरू सहजा सहजी
खरी वेदना लिहायची तर ठेव अंतरी जळजळ बाकी
रोज दिसे मज अश्वत्थामा गर्दीमध्ये या लोकांच्या
दुःख फाटके डोक्यावरती अन रक्ताची भळभळ बाकी
कवितेच्या काही ओळी
काल सहज सुचल्या
दोन चुकल्या मात्रेत
दोन वृत्तात गंडल्या
यतिभंग एकीमध्ये
एकीमध्ये रसभंग
दोष दूर करण्यास
पछाडिले जंग जंग
वृत्तछंदांची बंधने
पाळताना दमछाक
झाली-आली कुठूनशी
मुक्तछंदाची झुळूक
मुक्तछंदाच्या स्पर्शाने
ओळ ओळ थरारली
कोष कोंदट फोडून
फुलपाखरे उडाली
खळखळ तुटताना
बेड्या आनंदे म्हणती
गण, वृत्त, मात्रा यांची
मुक्तछंदी ना गणती
एरवी भिणभिणणारा वारा
आज संथ वाहतो आहे,
संतापलेला सूर्य काहिसा
स्तब्ध पाहतो आहे,
तसं सारं काही खुशाल
पण मनात अनामिक दुःख दाटतंय
आज काहीतरी वेगळंच वाटतंय..
चेहऱ्यावर नेहमीचीच प्रसन्नता
पण मनातून खिन्नता,
शून्यात नजर रोखून कुठे
डोळ्यांतही सून्नता,
ऋतू कुठला त्याचा मागमूस नाही
फक्त तुझ्या आठवणींचं धुकं मनात दाटतंय,
आज काहीतरी वेगळंच वाटतंय..
चांदण्याला तेथे प्रवेश नाकारताना
जेथे शरीरसंपदा तुझी साकारताना
रेलावे की चूर व्हावे खेटून तुला ओणवे
रात्र"ही" थकून जावी अन् चंद्र मी व्हावे
गोपचांदण्या गोफ लोभसे पाहती बांधू मला
राधाअवनी प्रीत मोहक पाहती रांधू मला
तिला सतवाया जरासे कलेकलेने गुप्त व्हावे
भरती सागरास यावी अन् चंद्र मी व्हावे
उल्का लाखो, तारे चमचमणारे कोट्यावधी
निखळती नक्षत्रे सारी नजर तुझी पारधी
आकाशगंगा ही करी तुला पाचारण हळवे
नक्षत्र तू अठ्ठाविसावे अन् चंद्र मी व्हावे